Sangli News : सोशल मीडियावर बिबट्याची दहशत ; सांगलीत भीतीचं वातावरण
सांगलीत बिबट्याची धूम
सांगली : सांगली शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या उपस्थितीची चर्चा जोरदार सुरू आहे. पोलीस आणि वन विभागाने गस्ती सुरू केली आहे. विश्रामबाग, विजयनगर, कुंभार मळा, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी वन विभागाने कॅमेरे लावले आहेत.
परंतु बिबट्याचे दर्शन झाले नाही. तरीही सोशल मिडीयावर अफवांचा महापूर सुरू आहे. त्यामुळे सांगलीत बिबटयाची दहशत कायम आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीतील कुंभार मळा येथे बिबटयाच्या पावलाचे ठसे आढळल्याने वन विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
चोवीस तास गस्ती सुरू आहे. दोन दिवसांच्या गस्तीनंतरही बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. परंतु, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सोशल मीडियावर बिबट्याचे व्हायरल झालेले फोटो नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरले आहेत. विश्रामबाग परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या मंगळवारी घटलेली दिसली, काही शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे सांगण्यात आले.
काही खुणा आढळल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष बिबट्या दिसला नाही. सोशल मिडीयावर जे फोटो व्हायरल होत आहेत. ते एआय तंत्रज्ञानाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. सतर्क रहावे. बिबट्या दिसताच नागरिकांनी वनविभाग अथवा नजीकच्या पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन उपवनसंरक्षक सागर गवते यांनी केले आहे.