आगाशिवनगरात बिबट्याचा मुक्काम
कराड :
कराड शहरालगतच्या आगाशिवनगर परिसरात बिबट्याची वर्दळ वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यापासून सायंकाळीच रस्ते ओस पडू लागले आहेत. सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत अभिनव कॉलनीच्या परिसरात बिबट्या फेरफटका मारत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्याने नागरिकांना धसका बसला आहे.
दरम्यान या घटनेपूर्वीच रविवारी सायंकाळीही बिबट्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाजवळ व आगाशिव डोंगराच्या उतारावर दिसल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळीही तो मानवी वस्तीकडे वळण्याचा प्रयत्न करताना काही नागरिकांच्या नजरेस पडला होता. बिबट्याच्या या हालचालीचे काहींनी मोबाईल चित्रिकरणही केले आहे.
मात्र, सोमवारी त्याने प्रत्यक्ष वस्तीत मल्हारी चव्हाण यांच्या घराशेजारून पळ काढला. बिबट्याचे गुरगुरणे आणि घराजवळच्या मोकळ्या जागेत हालचाली झाल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. परंतु तोवर बिबट्या अंधाराच्या आड होऊन डोंगराच्या दिशेने निघून गेला. परिसरातील पाळीव जनावरांवर त्याचा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या पंधरवड्यात आगाशिवनगर परिसरात बिबट्या मानवी वस्तीत दिसण्याचे पाचपेक्षा अधिकप्रकार आहेत. अभिनव कॉलनीत सोमवारी सायंकाळी बिबट्या दिसल्यानंतर त्या कॉलनीच्या आजूबाजूच्या दहा ते पंधरा कॉलन्यांमधे सन्नाटा पसरला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याचा वावर ठरावीक वेळेत विशेषतः पहाटे व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वाढला आहे. यामुळे शाळेतून परतणारी मुले, संध्याकाळी फेरफटका मारणारे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. मानवी वस्तीत वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने तो इथे मुक्कामालाच थांबला की काय, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.