Satara : गोडोली परिसरात बिबट्याचा संचार ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गोडोलीत बिबट्याचा उच्छाद; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
by विजय जाधव
सातारा : गोडोली (ता. सातारा) शिवप्रेमी कॉलनी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सुवर्णा पाटील यांच्या घरासमोर दोन वेळा दिसलेल्या या बिबट्याचा व्हिडिओ कॉलनीतील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लावर झडप घालून त्याचा शिकार केला. त्यानंतर तो ऐटीत चालत स्वराज्य नगराच्या दिशेने निघून गेला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिकांनी वनविभागाला तत्काळ माहिती दिली असली, तरी “मनुष्याचा जीव गेल्यावरच वनविभागाला जाग येणार का?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लहान मुले व वृद्धांची ये-जा या परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने, वनविभागाने तातडीने पिंजरे लावून गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.