Kolhapur : पेरणोली–बझरे परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
आजरा तालुक्यात बिबट्याची धमक
आजरा : गेल्या दोन दिवसांपासून पेरणोली व वझरे गावच्या दरम्यान काही ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान सोमवारी वनविभागचे पथक पेरणोली-बझरे दरम्यानच्या परिसरात दाखल झाले असून ग्रामस्थांना सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
पेरणोली-बझरे दरम्यानच्या डोंगर परीसरात बिबट्याचे दर्शन झाले. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यातच बिबट्याचा बाबर या परीसरात असल्याचे स्पष्ट झाल्याने कापणी व मळणीच्या कामाचे नियोजन कोलमडले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पेरणोली, बझरे तसेच धनगरवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. रविवारी या परीसरात बकरी व जनावरे चारण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना अगदी काही फुटाच्या अंतरावरून बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी जीव मुठीत घेऊन गाव गाठले.
बिबट्याचा वावर या परीसरात असल्याचे समजताच ग्रामस्थांनीही शोध घेतला. सोमवारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसह या परीसराची पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पायाचे ठसे काही ठिकाणी आढळून आले. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही ग्रामस्थांनी बिबट्याबरोबरच या परिसरात पट्टेरी वाघाचा बावरही असल्याचे यावेळी सांगितले.