Sangli | वानलेसवाडी कुंभार मळा परिसरात बिबट्याचे दर्शन ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
सांगलीत बिबट्याचा मुक्त संचार
सांगली : वानलेसवाडी ते भारती हॉस्पिटल रोड आणि कुंभार मळा परिसरात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे बिबट्या फिरत असल्याचे दृश्य काही स्थानिक नागरिकांनी पाहिल्याची माहिती समोर आली आहे. अचानक दिसलेल्या बिबट्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे खरटमाल यांच्या शेतात आढळून आले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे काही जणांनी रस्त्यालगतच्या झुडपातून बिबटया बाहेर येताना पाहिले. त्यानंतर लगेच वनविभागाला याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
वनविभागाचे अधिकारी सांगतात की, अलिकडे ग्रामीण भागातील शेती पट्ट्यात तसेच नदीकाठच्या झुडपांमध्ये बिबट्यांचे वावर वाढल्याचे आढळत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, परंतु सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे. सध्या बिबट्या नेमका कुठे गेला याचा शोध सुरू असून परिसरात गस्तही वाढविली आहे. कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.
बिबटया मादीचे वय अडीच वर्षे
कुंभार मळा येथील खरटमल यांच्या आंब्यांच्या शेतात पाणी पाजण्यात आले होते, या ठिकाणी बिबट्याचे पायाचे ठसे उमटले आहेत. पायाचे ठसे असणारा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय साधारण अडीच वर्षे असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाकडून मिळत आहे. आकारमान, चालण्याची पद्धत आणि पावलांचे ठसे पाहून तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला आहे.
वनअधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, अडीच वर्षांचा बिबट्या हा तसा बाल्यावस्थेत असतो. पण शिकारीसाठी तो स्वतंत्रपणे फिरू लागतो. अशा वयातील मादी बिबट्या प्रामुख्याने सुरक्षित आश्रयस्थानाच्या शोधात गवताळ व झुडपी भागात वावरत असतात. वनविभागाने सांगितले की मादी बिबट्याच्या हालचाली सामान्यतः शांत असतात, मात्र मानवजवळ जाण्यापेक्षा ती दूर राहणे पसंत करते. अशा वयाच्या बिबट्याला अन्नाची शोधमोहीम जास्त असते, त्यामुळे तो कधी कधी मानवी वस्तीजवळील परिसरात फिरताना दिसू शकतो.
नागरिकांनी चिथावणी देण्याचा किंवा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. सध्या वनविभाग पथकाकडून ठसे तपासणी, कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण आणि शोधमोहीम सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस पथकला दिसला
हा बिबट्या रविवारी रात्री भारती हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या एका पडक्या इमारतीकडे जाताना दिसला, त्यामुळे या पथकाने याची माहिती वनविभागास दिली वनविभागाकडून शोध मोहीम सुरु केली आहे.