सादळे येथे बिबट्याचे दर्शन
बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
दक्षता घेण्याचे वनविभागाला आवाहन
टोप:
सादळे गावच्या सिध्देश्वर मंदिराच्या डोंगराच्या उत्तरेला आंबाबाई तळ्यानजिक पूर्ण वाढ झालेला बिबट्या सादळे येथील शेतकरी अभिषेक पाटील यांना गवत कापणीसाठी गेले असता दिसून आला.
सादळे मादळे परिसरात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सादळे येथील अभिषेक पाटील आपल्या शेतामध्ये वैरण आणण्यासाठी जात असताना आंबुबाईच शेत नावाच्या शिवारातील तळ्या जवळील रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे दिसून आले आहे. अभिषेक पाटील यांनी प्रसंगावधान राखत आपली दुचाकी थांबवली इतक्यात बिबट्या समोरील झाडीत निघून गेला. त्याचे ठसेही त्या ठिकाणी पहायला मिळाले आहेत.
सादळे मादळे गावच्या दक्षिण व उत्तर दिशेला मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने बिबट्या, डुकरं, गवे, सांळीदर, तरस, कोल्हा, लांडगा यासह सरपटणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व आहे. दोन दिवसापूर्वी गव्याचा मोठा कळपाचे दर्शन झाल्याने तर रविवारी सकाळी बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
याबाबत वनपाल सागर घोलप यांनी शेतकऱ्यांनी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी व सकाळी लवकर गवत कापणीसाठी जाताना ग्रुपने जावे. किंवा टाळावे. गावालगत किंवा शेतात बिबट्या असल्यास त्याचा ड्रोनद्वारे शोध घेऊन जंगलाच्या दिशेने मार्गस्थ केला जाईल. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.