Leopard Attack: कुरळप परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, नागरिकांत भिती
बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण
सांगली (कुरळप) : कुरळप (तालुका वाळवा) येथील कुरळप येलूर शिवेवर असणाऱ्या वाळू वाट परिसरात मागील पंधरा दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याचा वावर वाढला असून पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढले आहेत. यामुळे कुरळपसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील जयसिंग आण्णा पाटील यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. यामध्ये कुत्र्याचे पोट फाडून आतडी कोथळा बाहेर काढला आहे. तर तानाजी रामराव चव्हाण यांच्याही कुत्र्याच्या लहान पिल्लावर हल्ला करून नरडीचा घोट घेतला आहे. असाच प्रकार मागील दोन दिवसांपूर्वी वाळू वाटेवरील मसोबा पाणंद जवळील एका वस्तीवरील बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केले होते.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून ऊस व इतर पिके करपू लागली आहेत. यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहेत. यातच या भागात सध्या रात्रीची लाईट असल्यामुळे अनेक शेतकरी पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात असतात. मात्र बिबट्यांचा शेळी व कुत्र्यावरील वाढते हल्ले या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुरळप परिसर हा मुख्य उसाचा परिसर आहे.
या परिसरात फार मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. उसाच्या पिकातूनच बिबट्याला लपायला व एकांतासाठी जागा उपलब्ध होत आहे. तसेच आता या परिसरात बिबट्याने पिलांना जन्मही दिला आहे. त्यामुळे या परिसरातील बिबट्यांची संख्या वाढत राहणार आहे. साहजिकच ही गोष्ट शेतशिवारात वस्तीत असणाऱ्या नागरिकांसाठी फारच भीतीदायक व काळजीची आहे.
बिबट्याकडून शेत शिवारात असणाऱ्या वस्तीवरील पाळीव जनावरांवरती हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे दगावल्याची संख्या वाढत चालली आहे. पाळीव कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाईंची वासरे, रेडके आदी बिबट्यांचे भक्ष बनत आहेत. साहजिकच या बिबट्याचा फटका दुधाळ जनावरांना बसू लागला आहे.
याचा परिणाम दुधाळ जनावरांची पिल्ली कमी होत असल्याचेही चित्र या परिसरातील आहे. वन विभागाकडून यावरती तोडगा काढावा अशी मागणी सतत नागरिकांकडून होत आहे. परंतु वन विभागाचे या गोष्टीवरती एकमत न होता तथास्तुच्या भूमीकेत राहत असल्याचे चित्र आहे.
विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रात्रीच्या ऐवजी शेतीला दिवसभर वीज देण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे. या परिसरात शेतीची लाईट गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी रात्रीची राहते आहे.
रात्रीचे उसाला पाणी पाजायला गेल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहत नाही. मुळातच शेतीची लाईट तासा तासाला येते आणि जाते त्यामुळे शेतकऱ्यांना जागे राहून रात्रीचे उसाला पाणी पाजावे लागते. इकडे तिकडे करत असताना बिबट्याचा धोका वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे.
वनविभागाने उपाय योजना करावी...
"कुरळप परिसरात शेत शिवारात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. या सर्व नागरिकांची गुरढोरे आहेत. दुधाळ जनावरे आहेत. वासरे आहेत, रेडकू आहेत, पाळीव कुत्री आहेत. त्यामुळे या नागरिकांमध्ये बिबट्याबाबत फारच भीतीचे वातावरण आहे. बिबट्या स्वत:च्या उंची एवढ्या सावजावरती हल्ला करतो. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, रेडके, वासरू ही पाळीव जाणारे बिबट्यांचे भक्ष होत आहेत. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त वनविभागाकडून होणे गरजेचे आहे."
- सुभाष पाटील, कुरळप