हंदिगनूर परिसरात बिबट्याचा वावर
कारचालकाच्या निदर्शनास बिबट्या : शेतवडीत ठसे : शेतकऱ्यांसह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
वार्ताहर/अगसगे
हंदिगनूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्याची घटना रविवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. शेतवाडीमध्ये बिबट्याचे ठसे दिसल्याने ग्रामस्थातून भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र वनखात्याने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप उमटत आहे. रविवारी रात्री हंदीगनूर-कुदनुर फाट्याजवळील नाल्याजवळ कुदनुरचे ग्रामस्थ कारमधून जात असता कारच्या समोरून बिबट्या जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित आपली कार हंदिगनूर गावाकडे वळविली व वेशीत येऊन ही कल्पना ग्रामस्थांना दिला. रविवारी पहाटेसुद्धा आपल्या नातेवाईकांना बिबट्या परिसरात वावरत असल्याचे सांगितले. त्यामुळे गावात व परिसरात एकच खळबळ माजली व भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याची शहानिशा करण्यासाठी गावातील काही नागरिक त्यांनी सांगितलेल्या स्थळाला जाऊन पाहणी केली असता त्या पिकांच्या शेतामध्ये बिबट्याचे ठसे उमटली होती. त्यामुळे बिबट्या असल्याची खात्री ग्रामस्थांना झाली आहे. याबाबत गावच्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे शेतवाडीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची कल्पना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे व याबाबत संबंधित काकती वन अधिकाऱ्यांना देखील कळविण्यात आले आहे. तरी अद्याप एकाही अधिकाऱ्याने गावाला भेट दिली नाही त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावात बिबट्या आल्याची दवंडी
याबाबत ग्रामस्थांनी गावामध्ये बिबट्या आला असून शेतवाडीमध्ये जाताना सर्वांनी सावध राहावे. आपल्या सुरक्षिततेसाठी हातामध्ये काठी किंवा अन्य वस्तू घेऊन जावे व सर्वत्र पाहत जावे. एखाद्याला जरी बिबट्या आढळल्यास त्याने अन्य लोकांना त्वरित कळवावे, अशी दवंडी गावामध्ये मारण्यात आली आहे. सध्या हंदिगनूर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.