For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडाल्को परिसरात बिबट्या सदृश प्राणी?

11:11 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडाल्को परिसरात बिबट्या सदृश प्राणी
Advertisement

सीसीटीव्हीत छबी कैद, नागरिकांत भीती : अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम सुरू

Advertisement

बेळगाव : शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंडाल्को परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री 10 वाजता बिबट्या सदृश प्राण्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान माहिती मिळताच वन खात्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम हाती घेतली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या हिंस्त्र प्राण्याचा व्हिडिओ मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क रहावे, असे आवाहन वनखात्याने केले आहे. वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली असून आढळून आलेल्या प्राण्याबाबत कोणतेच पुरावे हाती लागले नाहीत. मात्र हिंडाल्को शेजारी वनक्षेत्र असल्याने या परिसरात हा प्राणी गेला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान खबरदारी म्हणून वनखात्याचे पथक हिंडाल्को परिसरात तळ ठोकून आहे. मागील काही दिवसांत वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीत वाढू लागला आहे. हत्ती, गवा आणि त्यानंतर बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय वन्यप्राण्यांना रोखण्याचे नवे आव्हानही खात्यासमोर उभे ठाकले आहे. हिंडाल्को परिसरात हिंस्त्र प्राणी आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंडाल्को कंपनीत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे.

हिंडाल्को परिसरात दाट झाडी

Advertisement

हिंडाल्को परिसरात अलिकडे रोप लागवड वाढली आहे. त्यामुळे दाट झाडीने हा परिसर गर्द झाला आहे. दरम्यान या दाट झाडींमध्ये मोर, ससे, रानमांजर यासह लहान, पशुपक्ष्यांची संख्या वाढली आहे. यांना भक्ष्य करण्यासाठी बिबटा आला असावा? असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. कुत्रा हा बिबट्याचे आवडते खाद्य असल्याने भटक्या कुत्र्यांच्या शोधात बिबट्या सैरभैर झाला असावा.

आता बिबट्या आला!

मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू झाला आहे. हत्तीने शहराच्या वेशीपर्यंत धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गवी रेड्यांचेही दर्शन झाले होते. त्यापाठोपाठ आता बिबट्यासदृश प्राणी आढळून आला आहे. त्यामुळे हत्ती गेला, गवी गेला अन् बिबट्या आला, असे बोलले जात आहे.

रेसकोर्स परिसरात आलेल्या बिबट्याची आठवण

हिंडाल्को परिसरात आढळून आलेल्या बिबट्यासदृश प्राण्यामुळे दीड वर्षापूर्वी रेसकोर्स परिसरात आलेल्या बिबट्याची आठवणी पुन्हा एकदा शहरर्वसियांना झाली आहे. तब्बल महिनाभर बिबट्याने तळ ठोकला होता. त्यामुळे वनखात्याचीही झोप उडाली होती. पुन्हा आता बिबट्यासदृश प्राण्यामुळे शहरात वन्यप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.

शिवरुद्राप्पा कबाडगी-एसीएफ बेळगाव

हिंडाल्को कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झालेला वन्यप्राणी बिबट्या आहे की तरस याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्रीपासून शोधमोहीम हाती घेतली आहे. बिबट्या की तरस याबाबत संभ्रम आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

Advertisement
Tags :

.