Solapur : टेंभुर्णीत बिबट्याचा कहर ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
टेंभुर्णी गावच्या शिवारात बिबट्याची दहशत
टेंभुर्णी : टेंभुर्णी गावच्या शिवारात कुटे-झिरपे वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने व दोन दिवसांपूर्वी एका रेडकाचा बिबट्याने फडशा पाडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे बिबट्यास तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
टेंभुर्णी गावच्या शिवारात कुटे झिरपे वस्तीजवळ दोन दिवसांपूर्वी सचिन महाडिक यांच्या म्हशीचे तीन महिन्यांचे रेडकू बिबट्याने फस्त केले होते. महाडिक हे पहाटे म्हशीजवळ आले असता तेथे रेडकू दिसून आले नाही.
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरणउजाडल्यावर पाहिले असता तेथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. नंतर पाच-सहा जणांनी पुढे उसात जाऊन पाहिले असता तेथे फस्त केलेले रेडकाचे अवशेष दिसून आले. यानंतर शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले. चांगदेव नाळे दुचाकीवर जात असताना त्यांना येथे बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला.
टेंभुर्णी शिवारात बिबट्या दिसला
रेडकू खाल्ल्याने महाडिक यांची म्हैस पण आटली आहे. त्यानंतर वनविभागास पाचारण करण्यात आले. त्यांनी ठसे पाहून ते बिबट्याचे ठसे असल्याच्या शेतकऱ्याच्या म्हणण्यास दुजोरा दिला आहे. तसेच जनावरांच्या गोठ्याजवळ लोखंडी जाळी लावण्याची व फटाके वाजविण्याचा सल्ला दिला आहे. वनविभागाने पंचनामा केला आहे. बिबट्याच्या अफवेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या सर्वत्र ऊसतोड सुरू असून शेतातील कामे खोळंबली आहेत.