Kolhapur News : पन्हाळा पायथ्याशी बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
पन्हाळगडाच्या पायथ्याशी बिबट्याचे पिल्ले मृतावस्थेत आढळले ; ग्रामस्थांच्या भितीचे वातावरण
पन्हाळा : पन्हाळगडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या आपटी पैकी सोमवारपेठ गावात गुरुवारी सकाळी बिबट्याचे पिल्ले मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेने या बिबट्याचा पिल्लाचा मृत्यू कशाने झाला याबाबत मोठे बादळ उठले आहे. मानवी वस्तीतच ही घटना घडल्याने बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याचा इशारा या निमित्ताने दिल्याने ग्रामस्थांच्या भितीचे वातावरण पसरले आहे.
पन्हाळगडाच्या उत्तरेस तबक उद्यान आहे. याच उद्यानाच्या बरोबर खालील बाजूस सोमबारपेठ हे गाव वर्षानुवर्षे बसलेले आहे. या गावाला वन्यप्राण्याचा त्रास हा नेहमीचाच होऊन बसला आहे. गावातील विलास शामराव गायकवाड यांच्या घराचे बांधकाम सुरु असुन त्यांच्या गोठ्यांच्या बाजूला हे गुरुवारी सकाळी जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेले असता त्यांना हा बिबट्याचे बछडे घराच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या भरावात मृत अवस्थेत आढळुन आले.
त्याच्या गळ्याला व मानेला मोठे दात घुसले असून जखम झाली आहे. त्यांनी याची माहिती तत्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक हे घटनास्थळी पोहचुन बिबट्याच्या पिल्ल्याच्या मृतदेह ताब्यात घेऊन तो शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पशुधन विकास अधिकारी अविनाश जाधव व संतोष बाळवेकर यांनी या बिबट्याचे शवविच्छेदन केले. दरम्यान हे बछडे एक ते दीड वर्षाचे मादी असुन मोठ्या बिबट्यांने त्याच्या गळ्याला चावा घेतल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर आले असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.