पीक संरक्षणासाठी लावलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू
कारवार : रानडुकरापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकून बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना कुमठा तालुक्यातील देवगिरी भागात घडली आहे. दरम्यान या घटनेला वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत ठरवत स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी कुमठा तालुक्यातील देवगिरी प्रदेशात रानडुकरांच्या उपद्रवात वाढ झाली आहे. डुकरांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी ठिकठिकाणी सापळे लावीत आहेत.
देवगिरी परिसरात बिबट्या आपल्या पिल्लासह फिरत आहे. अशी माहिती स्थानिकांनी वनखात्याला दिली होती. तरीसुद्धा वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे खबरदारीचे उपाय हाती घेतले नाहीत. दरम्यान रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यानी लावलेल्या सापळ्यात बिबट्याचे पिल्लू अडकले आणि त्याच्यातच पिल्लाचा मृत्यू झाला. पुढे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळ्यामुळे नव्हे तर अन्य कारणामुळे पिल्लाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक अधिक संतप्त झाले आहेत. आणि त्यानी वन खात्याच्या विरोधात आक्रोश केला आहे. वनखात्याचे कर्मचारी दोषींवर योग्य ती कारवाई करीत नाहीत, वनखात्याच्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीत नाहीत अशी तक्रार स्थानिकांच्याकडून केली जात आहे.