विजापूर जिल्ह्यात बिबट्या जेरबंद
मणंकलगी गावातील युवकांच्या सहकार्याने वन विभागाची कारवाई : हल्ल्यात तिघेजण जखमी
वार्ताहर/विजापूर
चडचण तालुक्यातील मणंकलगी गावातील तलावाजवळ जक्कप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत बिबट्या आढळून आला होता. दरम्यान, बिबट्याने बागेतील तिघांवर हल्ला केला. स्थानिकांनी याची माहिती पोलीस आणि वन विभागाला फोनवरून दिली. याची माहिती मिळताच झळकी पोलीस स्थानकाचे पीएसआय एस. बी. पाटील यांनी वन विभागाला संपर्क साधून तातडीने घटनास्थळी येण्याचे सांगितले.
यानंतर झळकी पोलीस, वन अधिकारी आणि बरडोल, हलसंगी गावातील गोल्लारांचा मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू केली. 4 ते 5 तास बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. अखेर बिबट्या बागेतून 3 लोकांवर हल्ला करून द्राक्ष बागेत लपला होता. त्यानंतर हलसंगी गावातील युवकांच्या सहकार्याने बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळविले.
संतोष तांबे, ईरण्णा मेत्री आणि महादेव यादवाड (सर्वजण रा. मणंकलगी) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. मणंकलगी, लोणी बी.के., तड्डेवाडी, हलसंगी, गोत्याळ, एळगी या गावांतील शेकडो लोकांनी बिबट्याच्या भीतीने घर बंद करून घरात बसून होते. या परिसरात चार ते पाच महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता, असे सांगितले जात आहे. परंतु शुक्रवारी ग्रामस्थांसह पोलीस आणि वन विभागाच्या मदतीने हलसंगी, बरडोल आणि गोल्लार युवकांच्या प्रयत्नामुळे बिबट्यास पकडण्यात आले.
यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यात सहकार्य करणारे मणंकलगी गावातील सदस्य हणमंत कोळी, नागनाथ बिरादार, सोमशेखर मालबागी, ऊद्रू लोणी, विठ्ठल वडगांव यांच्यासह हलसंगी आणि बरडोल गावातील गोल्लार युवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल निरीक्षक, चडचण झळकी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. बी. पाटील, ग्राम प्रशासन अधिकारी चिदानंद डत्ती, गणेश पाटील, पंचायत कर्मचाऱ्यांसह वन विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.