Leopard Attack: दिवसा ढवळ्या बिबट्याचा शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला, 12 शेळ्या ठार
हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण
कुरळप : ऐतवडे खुर्दसह कुरळप, येलूर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून येत आहे. आता तर ऐतवडे खुर्द मध्ये बिबट्याच्या हल्ल्याचा कहरच झाला. बिबट्याने दिवसा ढवळ्या शेळ्या मेंढ्यांवरती हल्ला करून तब्बल १२ शेळ्या ठार केल्या असल्याची घटना ऐतवडे खुर्द येथे घडली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे या परिसरात मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ऐतवडे खुर्द येथील चौगुले पाणंद शेतामध्ये असणाऱ्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून १२ बकरी ठार केल्या. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
ऐतवडे खुर्द गावापासून दोन किलोमीटर अंतरावर चौगुले पाणंद (मौहटी) हा शेत शिवार आहे. येथील राजाराम परीट यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून खताकरिता शेळ्या मेंढ्या बसवलेल्या आहेत. नागाव येथील पोपट चंदर शिरसाळे यांच्या मालकीच्या शेळ्या मेंढ्या बसविण्यास आहेत. गुरुवारी भर दुपारी या ठिकाणी बिबट्याने हल्ला करुन लहान-मोठ्या बारा बकऱ्या ठार केल्या आहेत.
मेंढपाळ पोपट शिरसाळे यांचे एक लाखावर नुकसान झाले आहे. याच परिसरात मेंढपाळांची वीस कुटुंबे आहेत. बिबट्याचा वावर असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याचे पायाचे ठसे निदर्शनास आले. वनरक्षक विशाल डुबल, क्षेत्रीय सहायक शहाजी पाटील, गौरव गायकवाड यांनी या ठिकाणी भेट दिली. डॉ. हेमांकन चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला.