येळ्ळूर भागात मसूरला बुरशीजन्य रोगाचा फटका
वार्ताहर /येळळूर
येळ्ळूर परिसर जसा बासमती भातपिकासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तसा रब्बी मसूर पिकासाठी आहे. जमिनीच्या विशिष्ठ गुणवत्तेमुळे एक वेगळी चव लाभलेल्या या मसूरला ग्राहक बाजारात अग्रक्रमाने पसंती देतो. त्यामुळे बाजारात व इतरत्र मागणीही मोठी प्रमाणात आहे. पण गेली कांही वर्षे या पिकाला बुरशी (पंगस) रोगाने ग्रासल्यामुळे म्हणावे तसे उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सुरुवातीला भातकापणी केलेल्या शेतकऱ्यांनी वातावरणात जाणवणारी थंडी बघता रब्बीसाठी मसूर, हरभरा, मोहरीसारख्या पिकांची पेरणी केली. जमिनीतील ओलाव्यामुळे पीक उगवूनही चांगले आले. पण अकस्मात बदललेल्या वातावरणामुळे व तुरळक पावसाच्या सरीमुळे उगवलेले पीक मरु लागले. याचा अधिक फटका मसूर पिकाला बसला. मसूरसारखे नगदी पीक हातचे जाते. या विचाराने शेतकरी चिंतेत पडला.
यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक असून व्हरिराव्हेकस पावडर एक किलो बियाणाला चार ग्रॅमप्रमाणे चोळुन पेरणी करावी. उगवणीनंतरही हा प्रादुर्भाव जाणवल्यास हेच औषध एका फवारणी पंपासाठी तीस ग्रॅम पावडर वापरुन पंपांचा नॉब काढून प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी जमिनीत फवारणी केल्यास या रोगाला आळा बसतो, असे सांगितले. त्याचप्रमाणे जैविक औषधही या रोगावर प्रभावी ठरत असून बिजप्रक्रियेकरीता ट्रायकोडमी औषधाचा वापर करावा, असेही सांगितले. ट्रायकोडमी हे जैविक औषध शेणखतामध्ये मिसळून आठ दिवसांनी शेतात शिंपून पेरणी केल्यास फायदा होतो. फंगसच्या निर्मूलनासाठी असे शिंपण सतत चार ते पाच वर्षे करणे आवश्यक आहे. या फंगस रोगाच्या निर्मूलनासाठी मजगाव येथे धारवाड अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एका प्लॉटवर प्रयोग सुरू असून धामणे येथे कृषी विज्ञान केंद्र मत्तीकोपच्या माध्यमातून शंभर एकर क्षेत्रावर दुसरा प्रयोग सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून रब्बी पिकाची पेरणी केली नाही त्यांनी बियाण्यावर प्रक्रिया करून पेरणी करावी,असेही सांगितले.
अति पावसामुळे बुरशीचा प्रभाव
याबाबत कृषी विभागाचे तांत्रिक व्यवस्थापन राजशेखर भट्ट व कृषी अधिकारी रवी गुडमनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येळ्ळूर शिवारात येवून पाहणी केली. यावेळी त्यांनी असे सांगितले की, पावसाचे अतिप्रमाण झाले की जमिनीत विल्ट नावाचे फंगस वाढते व त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होतो. प्रामुख्याने हे फंगस येळ्ळूर, मजगाव व धामणे परिसरात अधिक असल्याचे सांगितले.