लेन्सकार्टचा येणार आयपीओ, लवकरच सेबीकडे अर्ज
नवी दिल्ली :
चष्म्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी लेन्सकार्ट यांचा आयपीओ लवकरच शेअर बाजारामध्ये सादर केला जाणार आहे. येत्या काही दिवसातच कंपनी रितसर कागदपत्रांसह आपला अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे दाखल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार लेन्सकार्ट कंपनी आयपीओच्या माध्यमातून 8300 कोटी रुपये उभारू शकते.
मूल्य 83 हजार कोटींवर पोहचणार
याच दरम्यान कंपनीच्या समभागधारकांकडून 2090 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या आयपीओच्या रक्कम उभारणीनंतर कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 83 हजार कोटींवर जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. कंपनीचा आयपीओ याच वर्षी बाजारात दाखल होणार असून या संदर्भातला अर्ज सेबीकडे लवकरच सादर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. लेन्सकार्ट ही एक भारतीय टेक स्टार्टअप कंपनी आहे जी शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध होणार आहे. याआधी शेअर बाजारामध्ये ग्रोव्ह, मीशो आणि फिजिक्सवाला यांचे आयपीओ बाजारात दाखल झालेत.
दमदार महसुल
लेन्सकार्टच्या व्यवसायाचा विचार करता आर्थिक वर्ष 2023-24 वर्षात कंपनीने 43 टक्के वाढीसह 5427 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. याच्या मागच्या वर्षामध्ये हाच महसूल कंपनीने 3788 कोटी रुपयांचा कमावला होता. दुसरीकडे कंपनीने तोट्यामध्ये घसरण करण्यामध्येसुद्धा यश मिळवले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये तोटा 63 कोटी रुपयांचा होता, जो कमी होत 2024 मध्ये 10 कोटी रुपयांवर आणण्यामध्ये कंपनीला यश आले आहे.
दक्षिण भारतात होतोय निर्मिती प्रकल्प
कंपनीचा व्यवसाय फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. जगभरामध्ये पाहता कंपनीची जवळपास 2500 शोरूम्स आहेत. त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ करायचा प्रयत्नही कंपनीकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण भारतामध्ये कंपनी एक नवा निर्मिती प्रकल्प उभारत आहे. ज्यामध्ये 1660 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे समजते.