दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात घेतला शेवटचा श्वास, उद्योगविश्वासह साऱ्या देशावर शोककळा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतातील सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपैकी एक ‘टाटा समूहा’चे चेअरमन एमेरिटस आणि दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय आणि जागतिक उद्योग जगतावर अविट छाप सोडलेल्या या दूरदर्शी उद्योगपतीच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असून संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.
‘टाटा समूहा’चा वारसा समर्थपणे चालवताना रतन टाटा यांनी या प्रतिष्ठित भारतीय समूहाचे रुपांतर जागतिक ‘पॉवरहाऊस’मध्ये केले आणि भारतीय उद्योगविश्वाचे चित्र कायमचे बदलले. 1991 ते 2012 असे दोन दशकांहून अधिक काळ समूहाचे नेतृत्व केलेल्या टाटा यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात त्यांनी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, चिंतेचे कोणतेही कारण नाही. मी चांगल्या स्थितीत आहे. परंतु बुधवारपर्यंत त्यांची परिस्थिती गंभीर बनली. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात टाटा यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
‘आम्ही अतीव दु:खाने रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत. ते एक असाधारण नेता होते, त्यांच्या योगदानामुळे टाटा समूह आणि राष्ट्र या दोघांनाही आकार मिळाला. केवळ अध्यक्षापेक्षा ते एक मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांच्या अधिपत्याखाली टाटा समूहाने उत्कृष्टता, सचोटी आणि नवे उपक्रम यांच्याशी बांधिलकी राखताना जागतिक स्तरावर विस्तार केला. धर्मादाय कार्याच्या बाबतीत त्यांचे समर्पण लाखो लोकांना स्पर्श करून गेले आणि त्यामुळे शिक्षण तसेच आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांवर कायमचा प्रभाव पडला. प्रत्येक संवादातील त्यांची अस्सल नम्रता कायम लक्षात राहील. टाटा परिवाराच्या वतीने आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांचा वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील’, असे समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘टाटा समूहा’वर अविट छाप
28 डिसेंबर, 1937 रोजी जन्मलेले रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होत. 1991 मध्ये ‘टाटा समूहा’ची होल्डिंग कंपनी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनत जे. आर. डी. टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. 1991 ते 2012 या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ‘टाटा समूहा’मध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. या कालावधीत समूहाने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ताब्यात घेतल्या आणि नाविन्यपूर्ण पावले टाकली.
2012 मध्ये पायउतार झाल्यानंतर ‘चेअरमन एमिरेटस’
1996 मध्ये रतन टाटा यांनी ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ ही समूहाची दूरसंचार शाखा स्थापन केली आणि 2004 मध्ये त्यांनी समूहाची ‘आयटी’ कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ला शेअर बाजारात उतरविले. 2012 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांनी ‘टाटा सन्स’, ‘टाटा इंडस्ट्रिज’, ‘टाटा मोटर्स’, ‘टाटा स्टील’ आणि ‘टाटा केमिकल्स’सह ‘टाटा’च्या अनेक कंपन्यांचे ‘चेअरमन एमेरिटस’ हे मानद् पद स्वीकारले. आपल्या सेवाभावी कार्यासाठी विख्यात असलेले रतन टाटा हे धर्मादाय कार्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘टाटा ट्रस्ट’चा कारभार हाताळत होते. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन टाटा यांना 2000 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2008 मध्ये ‘पद्मविभूषण’ अशा भारतातील दोन सर्वोच्च नागरी सन्मानांनी सन्मानित करण्यात आले होते.
दूरदर्शी उद्योगपती, दयाळू व्यक्ती
‘रतन टाटा हे उद्योगविश्वातील एक दूरदर्शी नेते, एक दयाळू व्यक्ती आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित उद्योग घराण्यांपैकी एकाला स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्याचवेळी त्यांचे योगदान या क्षेत्राच्या किती तरी पलीकडे गेले. त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याकडील अतूट बांधिलकी त्यांना असंख्य लोकांशी जोडून गेली.’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी