क्रिकेट क्षेत्रातील प्रख्यात पंच डिकी बर्ड कालवश
► वृत्तसंस्था / लंडन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात आयसीसीचे नामवंत पंच हेरॉल्ड उर्फ डिकी बर्ड यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आयसीसीच्या इलाईट पंच पॅनलमध्ये डिकी बर्ड तसेच शेफर्ड हे अनुभवी आणि दर्जेदार पंच म्हणून ओळखले जातात.
डिकी बर्ड यांनी 1973 ते 1996 या 23 वर्षांच्या कालावधीत 66 कसोटी आणि 69 वनडे सामन्यात आयसीसीचे पंच म्हणून सेवा बजावली. 1996 साली लॉड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील झालेल्या कसोटी सामन्यात डिकी बर्ड यांनी पंचगिरी केली होती. त्यांच्या पंचगिरीच्या क्षेत्रातील हा शेवटचा सामना होता. याच सामन्यात भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि राहुल द्रवीड यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते.
यॉर्कशायर काऊंटी क्रिकेट क्लबने डिकी बर्ड यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे घोषित केली. यॉर्कशायर क्लब आणि डिकी बर्ड यांच्यात दीर्घ कालीन संबंध होते. बर्ड यांनी 1956 साली यॉर्कशायर संघाकडून आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेट कारकिर्दीला प्रारंभ केला आणि 1964 साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. डिकी बर्ड याने 93 प्रथमश्रेणी सामन्यात दोन शतकांसह 3314 धावा जमविल्या आहेत. क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल डिकी बर्ड यांचा 1986 साली एमबीई तसेच 2012 साली ओबीई हा क्रिकेट क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार देवून यॉर्कशायरतर्फे सन्मानित करण्यात आले होते. जागतिक कसोटी क्रिकेट क्षेत्रामध्ये डिकी बर्ड आणि त्यांचे सहकारी इंग्लंडचे दिवंगत डेव्हिड शेफर्ड ही जोडी चांगलीच गाजली होती. 2009 साली डेव्हिड शेफर्ड यांचे निधन झाले. मैदानावर पंचगिरी करताना बर्ड यांचे अचूक निर्णय कोणत्याही खेळाडूला संशयास्पद वाटले नाहीत. क्रिकेटपटू आणि प्रेक्षकांमध्येही बर्ड यांच्याबद्दल आदर होता. 1974 साली इंग्लंड आणि भारत यांच्यात ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात डिकी बर्ड पंच म्हणून कामगिरी करत होते. चेंडूची शिवण कापण्यासाठी बर्ड आपल्याजवळ नेहमी कात्री बाळगत असतं. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी त्यावेळी बरेच केस वाढविले होते. हे केस त्यांच्या डोळ्यावर येत असल्याचे पाहून बर्ड यांनी गावसकरचे हे केस कापण्याचा निर्णय घेतला होता. डिकी बर्ड हे शेवटपर्यंत अविवाहीत राहिले. त्यामुळे त्यांच्या पश्चात क्रीडावृत्ती, माणुसकी आणि आनंद राहिले आहेत.