टीम इंडियाचा संकटमोचक अश्विनची निवृत्ती!
सर्वोत्तम अष्टपैलूपैकी एक ‘अॅश अण्णा’चा भावनिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 765 विकेट्स : चाहत्यांना धक्का
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू, दिग्गज फिरकीपटू व संकटमोचक अशी ओळख असलेल्या आर.अश्विनने अनपेक्षितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल असे म्हणत अश्विनने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर रोहितसोबत पत्रकार परिषदेत त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू राहिला आहे. विशेष म्हणजे, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. याशिवाय, अनेक असे विक्रम अश्विनच्या नावे आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. अॅडलेडनंतर तो गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाला आहे. गाबा कसोटी दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. यानंतर अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येत निवृत्ती जाहीर केली.
14 वर्षे, 765 विकेट्स अन् 4394 धावा
अश्विनने भारतासाठी एकूण 287 सामने खेळले. यापैकी 106 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 537 विकेट घेतल्या आहेत. त्याला 200 डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. तो 37 वेळा पाच बळी घेण्यात यशस्वी ठरला. तर 8 वेळा तो सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. याचबरोबर वनडेत 156 तर टी 20 मध्ये 72 बळी त्याने घेतले आहेत. गोलंदाजीसोबत फलंदाजीतही ठसा उमटवताना त्याने 4394 धावा केल्या आहेत. आपल्या 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने शानदार कामगिरी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे.
प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्याबरोबर खूप आठवणी निर्माण केल्या आहेत. हा खूप भावूक करणारा प्रसंग आहे. पण, हीच थांबण्याची योग्य वेळ आहे.
आर.अश्विन, भारताचा दिग्गज फिरकीपटू.