गणरायांच्या स्वागतासाठी एलईडी दिव्यांचा लखलखाट
बेळगाव : घरोघरी तसेच मंडपांमध्ये गणराया विराजमान होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गणरायासाठी यावर्षी एलईडी दिव्यांमध्ये नाविन्यपूर्ण प्रकार उपलब्ध झाले आहेत. मल्टीकलर, एलईडीमुळे गणरायाचे मखर अधिकच सुंदर दिसणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. शुक्रवारी बापट गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली या परिसरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या जात होत्या. एलईडी फोकस लाईट, लेझर लाईट, एलईडीच्या माळा यासह असंख्य वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यापूर्वी केवळ चिनी एलईडी विक्रीसाठी येत होत्या. आता भारतीय एलईडी देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत. लाईटबरोबरच एलईडी पणत्या, समई, फळांच्या आकारातील दिवे, घंटा, ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
स्थानिक विद्युत माळांनाही मागणी
बेळगावमध्ये हाताने विणून तयार केलेल्या एलईडी माळा वर्षानुवर्षे तयार केल्या जातात. चिनी माळांपेक्षा या टिकावू असल्यामुळे गणेशभक्तांची याला मोठी मागणी असते. स्थानिक महिला या एलईडी माळा तयार करत असल्याने त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. 500 रुपयांपासून 2000 रुपयापर्यंत या विद्युतमाळा विक्री केल्या जात आहेत. विशेषत: मंडळांकडून या माळांना अधिक मागणी आहे. रात्रीच्यावेळी बेळगाव शहरातील बाजारपेठ विद्युत दिव्यांनी लखलखत आहे. बेळगावसह गोवा व चंदगड भागातील अनेक गणेश भक्तांकडून विद्युत दिव्यांची खरेदी केली जात आहे. मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसला होता परंतु बुधवारी संध्याकाळपासून हळूहळू खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. विद्युत दिव्यांच्या माळा 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत.
एलईडी स्ट्रीपला मागणी वाढली
मखराच्या आतील बाजूला प्रखर दिव्यांची एलईडी स्ट्रीप बसविली जात आहे. त्यामुळे या स्ट्रीपला मागणी वाढली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानदारांकडून स्ट्रीपची विक्री केली जात आहे. अनेक रंगांमध्ये या एलईडी स्ट्रीप विक्री केल्या जात आहेत. भिंती अथवा मखरामध्ये सहज चिकटल्या जात असल्याने यांना मागणी वाढली आहे.