एलईडी नौकामालकांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड
रत्नागिरी :
परप्रांतीय मच्छीमार नौका रत्नागिरी किनाऱ्यावर येत असून त्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात असताना रत्नागिरीत पकडलेल्या एका नौकेविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या नौकेला ३ लाख ४१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला तर एलईडी प्रकारचे दिवे वापरुन मच्छीमारी करणाऱ्या नौकेला ५ लाखाचा दंड करण्यात आला.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरात कर्नाटकच्या मल्फी येथील अलबहार ही मासेमारी नौका घुसत असताना पकडली. गेल्या १० दिवसापासून ही नौका मिरकरवाडा बंदरात अवरुद्ध करुन ठेवण्यात आली होती. नौका मालकाविरुद्ध अभिनिर्णय अधिकारी आनंद पालव यांच्या समोर प्रतिवेदन करण्यात आले. यावर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून निर्णय देण्यात आला. बंदर बदला बाबतची कोणतीही परवानगी न घेता घुसखोरी करणाऱ्या नौका मालकाला ३ लाख ४१ हजाराचा दंड करण्यात आला.
दापोली तालुक्यातील दाभोळ, हर्णे समुद्रात २० वाव अंतरावर एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या दोन नौका मत्स्य व्यवसाय खात्याच्या गस्ती पथकाने पकडल्या. यातील एका नौकेचे नाव राजेश्री तर दुसरीचे नाव भाविका असे आहे. एका आठवड्यापूर्वी जयगड बंदरात दोन्ही नौका अवरुद्ध करण्यात आल्या होत्या. याही प्रकरणात सादर झालेल्या अभिवेदनावर उभय पक्षांचे म्हणणे ऐकून निर्णय करण्यात आला. दोन्ही नौका मालकांना प्रत्येकी ५ लाख रु. एवढा दंड ठोठावण्यात आला.