‘जीवन विज्ञानातील अलीकडील प्रगती’ विषयावर व्याख्यान
प्रतिनिधी/ बेळगाव
जीएसएस कॉलेजच्या झुऑलॉजी व बॉटनीच्या युजी व पीजी विभागाने आयक्युएसीच्या सहकार्याने ‘जीवन विज्ञानातील अलीकडील प्रगती’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. एसकेई सोसायटीच्या आर. के. देसाई सायन्स इनोव्हेशन स्पेस हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
पहिल्या सत्रात कारवारचे सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. व्ही. एन. नायक यांनी ‘पर्यावरण व्यवस्थापनातील महासागरांची भूमिका’ हा विषय मांडला. जागतिक तापमानवाढ, समुद्रसपाटीची वाढ व मानवी हस्तक्षेपामुळे होणारे पर्यावरणीय धोके, सागरी परिसंस्थांचे पृथ्वीच्या हवामान नियमनातील महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात प्रा. एस. वाय. प्रभू यांनी उत्क्रांतीच्या माध्यमातून मानवाचे आकलन हा विषय मांडून मानवजातीचा उत्क्रांतीवादी प्रवास स्पष्ट केला. मानवी वर्तन, विचारशक्ती व जुळवून घेण्याची क्षमता कशी विकसित झाली? याचे विश्लेषण त्यांनी केले.
याप्रसंगी निवृत्त प्राचार्य डॉ. इजारी, प्राचार्य अभय के. सामंत, प्रा. व्ही. एम. तोपिनकट्टी, डॉ. पी. ए. देशपांडे, डॉ. एस. जयगौडर, राहुल खानोलकर, प्रियांका कुंडेकर, डॉ. बसवराज गौडर, डॉ. वाय. बी. दळवी, विज्ञान विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.