देश सोडून उध्वस्त वास्तूत...
कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना येईल आणि ती तो कशी आचरणात आणेल, याचे अनुमान काढता येणे अशक्यच आहे. यालाच ‘ईसाळ’ असेही म्हणतात. ब्रिटनमधील एक महिला, 34 वर्षीय सॅम माँडर हिला असाच ‘ईसाळ’ आला आणि तिने आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला. आता ती ब्रिटन सोडून फ्रान्सला गेली आहे. तसे पाहता अनेक जण नोकरी निमित्ताने किंवा अधिक पैसा कमावण्यासाठी देश सोडतात. पण या महिलेने या कारणासाठी देश सोडलेला नाही. ती आता फ्रान्समध्ये जाऊन एका 500 वर्षे जुन्या उध्वस्त झालेल्या वास्तूत वास्तव्य करीत आहे. साचेबद्ध नागरी जीवनाचा आपल्याला कंटाळा आला असून नवे ‘थ्रिल’ अनुभवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
ही उध्वस्त वास्तू एका पुरातन फार्महाऊसमध्ये आहे. हे फार्महाऊस या महिलेच्या पित्याने केवळ 12 लाख रुपयांमध्ये 1993 मध्ये विकत घेतले होते. ही उध्वस्त वास्तूही तेव्हढीच जुनी आहे. ही महिला येथे केवळ वास्तव्यास आहे असे नव्हे, तर या वास्तूचे नूतनीकरणही ती केवळ स्वत:च्या हाताने, अर्थात, कोणाचेही साहाय्य न घेता करत आहे. आपण आता येथेच वास्तव्य करणार असून त्यामुळे या उध्वस्त वास्तूचे, वास्तव्यास योग्य अशा स्थानात रुपांतर करण्याचा तिचा निर्धार तिने केला आहे. वास्तूंचे नूतनीकरण कसे करतात, याचे कोणतेही ज्ञान तिला नाही. पण ते तंत्र ती शिकून घेत आहे. ही वास्तू तिच्या पित्याने विकत घेतली, तेव्हा ती केवळ चार वर्षांची होती. नंतर ती ब्रिटनमध्ये कुटुंबासमवेत स्थायीक झाली. आता तिने या उध्वस्त वास्तूत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला असून ही वास्तूच आता तिचे घर आहे. या वास्तूत कोणतीही सुविधा आणि आरामदायी साधने नाहीत. तरीही तिने हा निश्चय केला आहे, हे विषेश मानले जात आहे.