आलिशान घर सोडून कॅराव्हॅनमध्ये वास्तव्य
7 लोकांचा परिवार, लाखोंची महिन्याला होतेय बचत
सध्या भाड्यावर चांगले घर मिळणे किती अवघड आहे, हे महानगरात परिवारासोबत राहणाऱ्या लोकांना माहित आहे. तर स्वत:चे घर घेण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचा अनुभवही लोकांना येत आहे. परंतु ब्रिटनमध्ये एका 7 लोकांच्या परिवाराने स्वत:चे आलिशान घर सोडून कॅराव्हॅनमध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. आता दर महिन्याला या परिवाराचे लाखो रुपये वाचत आहेत.
ब्रिटनच्या चेशायर येथे राहणारी लूसी वर्ननने (30 वर्षे) स्वत:चा पती आणि पाच अपत्यांसह मोठे आणि सुविधाजनक घर सोडून एका छोट्याशा स्टेटिक कारवांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. वाढती महागाई आणि खर्चामुळे या परिवाराला चार-बेडरुमचे भाड्याचे घर सोडून एका मिन्ट ग्रीन रंगाच्या छोट्या कारवांमध्ये राहण्यास भाग पडले आहे. भाडे अन् बिल्सवर दर महिन्याला सुमारे 3 लाख रुपये खर्च व्हायचे, यामुळे आम्ही आर्थिक दबाबात आलो होतो. परिस्थती पाहता हे पाऊल उचलावे लागल्याचे लुसीने सांगितले आहे.
विकले घराचे सामान
त्यांचे पूर्वीचे घर तीन बेडरुमचे होते, ज्यात गॅरेजलाही एक खोली करण्यात आले होते. विशाल लिव्हिंग रुम, डायनिंग एरिया आणि सर्वात मोठ्या किचनसह हे त्यांचे सर्वात मोठे घर होते, परंतु ही सुविधा अत्यंत महाग ठरत होती. पती स्कॉट (31 वर्षे) एक ट्रान्सपोर्ट कंपनी चालवितो, त्याने अन् लुसीने मिळून कारवांमध्ये राहत पैसे वाचविण्याचा आाणि भविष्यात स्वत:ची जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आता हा परिवार लूसीच्या नातेवाईकांच्या जमिनीवर भाड्याशिवाय राहत आहे. त्यांचा एकूण मासिक खर्च आात केवळ 30 हजारांपुरती मर्यादित झाला आहे. यामुळे दर महिन्याला 2.7 लाख रुपयांची बचत होतेय. परंतु या निर्णयासोबत अनेक त्यागही जोडलेले आहेत. अनेक कपडे, खेळणी आणि घराच्या सामग्रीपासून मुक्तता मिळवावी लागली, यातील काही सामग्री त्यांनी व्हिंटेड अॅपवर विकली तर काही दान केली.
परिवारात निर्माण झाली जवळीक
पूर्वी चार बेडरुम होते, तर आता त्यांच्याकडे केवळ तीन छोट्या खोल्या आहेत. लूसी आणि स्कॉट लिव्हिंग रुममध्ये सोफा-बेडवर झोपात, तर सर्वात छोट्या मुली एका खोलीत तर सर्वात मोठी मुलगी बेलाला स्वत:ची खोली मिळाली आहे. किचन सर्वात मोठे आव्हान ठरत असून तेथे भांड्याची संख्या मर्यादित करावी लागली आहे. कारवांमध्ये राहिल्याने परिवार आता भावनात्मक स्वरुपात अधिक जोडला गेला आहे. प्रथम मुली बेला आणि कोबी फोन अन् टॅबलेटमध्ये डोकावून असायच्या. आता त्या आमच्यासोबत बसणे पसंत करतात, कारण प्रत्येक जण एकाच ठिकाणी असल्याचे लूसी यांनी सांगितले. स्वत:च्या बचतीतून जमीन खरेदी करत त्यावर मोठा कारवां किंवा लॉज तयार करण्याची त्यांची योजना आहे.