हेवेदावे बाजूला ठेवून पक्षाच्या कामाला लागा!
- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना : आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा
प्रतिनिधी/ म्हापसा
एकमेकांबद्दल मनात हेवेदावे असतील तर ते बाजूला ठेवून पक्षासाठी काम करा. हे जुने व ते नवे’ असा वाद नको. मनभेदांमुळे पक्षाचे नुकसान करू नका, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना केल्या. त्याचबरोबर जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करा, असे आवाहनही त्यांनी केले. उत्तर गोव्यातून पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पुन्हा पक्षाला सर्वाधिक जागा प्राप्त करत 2027 साली सत्तेवर आणायचे आहे. माझा पक्ष संघटनेवर तसेच कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले. म्हापशातील उत्तर गोवा पक्ष कार्यालयात उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दयानंद कारबोटकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित मंडळ अध्यक्ष तसेच इतर कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, डिलायला लोबो, प्रेमेंद्र शेट तसेच पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ आमदारांचा केवळ विकासासाठी प्रवेश
काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या ‘त्या’ आमदारांनी केवळ विकासासाठी प्रवेश केला. त्यामुळे हे नवे ते जुने असा भेदभाव न करता एकत्रितपणे काम करा, असाही सल्ला त्यांनी दिला. मागील 63 वर्षांच्या काळात राज्यात झालेला विकास हा फक्त भाजप सरकारच्या काळात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
समाजसेवा करताना मी राजकारण करत नाही. कारण हे कार्य गोव्यातील लोकांसाठी आहे. मात्र भाजप वगळता काही विरोधक मात्र काम करताना राजकारण करतात, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. भाजप मंडळ निवडणूक होऊन मंडळ अध्यक्ष निवडल्यानंतर लगेच जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका देखील घेण्यात आल्या.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घ्या
शुक्रवारी निवडणूक झाल्यानंतर उत्तर गोव्यातील जिल्हाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी दयानंद कारबोटकर यांचे नाव घोषित केले. यावेळी ते बोलत होते. भाजप संघटनात्मक कामात युवकांना सहभागी करून घेण्यावर भर देत असले तरी काही ज्येष्ठ नेत्यांचीही पक्षाला गरज आहे. त्यामुळे ज्येष्ठांची पक्षात उच्च पदांवर नेमणूक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. युवक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे, असे सांगितले.
भाजप हा लोकशाहीवर आधारित पक्ष आहे. आम्ही उत्तर गोव्यात 20 मतदारसंघांमध्ये निवडणुका घेतल्या आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत भाजप कार्यकर्त्यांचे योगदान आणि ताकद महत्त्वाची आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी आपल्या कारकीर्दीत भाजपसाठी केलेल्या कार्याची यावेळी माहिती दिली. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर यांनी आपल्यास दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सर्वांनी आपल्यास सहकार्य करावे जेणेकरून पक्षवाढीसाठी मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले.