For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालदीव सोडा, भारताची निवड करा

06:21 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मालदीव सोडा  भारताची निवड करा
Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

मालदीवने इस्रायलच्या नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या कार्यालयाने यासंबंधी माहिती देत गाझामधील इस्रायलच्या कारवाईला विरोध म्हणुन मालदीवने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. तर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने स्वत:च्या नागरिकांना मालदीवला न जाण्याचा सल्ला दिला आहे. तर भारतातील इस्रायलच्या दूतावासाने स्वत:च्या देशाच्या नागरिकांना मालदीवऐवजी भारताला भेट देण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलच्या दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांसाठी भारतातील सुंदर समुद्र किनारे असलेल्या पर्यटनस्थळांची यादी जारी केली आहे.

मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारने इस्रायल-गाझा युद्धात पॅलेस्टाइनचे समर्थन केले आहे. सरकारने देशात पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल करत इस्रायलच्या पासपोर्टवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लागू झाल्याने इस्रायलच्या नागरिकांना मालदीवमध्ये प्रवेश करता येणार नाही. इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे 8 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे.

Advertisement

मालदीवने आता इस्रायलच्या नागरिकांवर प्रवेशबंदी घातली आहे. यामुळे काही अद्भूत आणि सुंदर भारतीय समुद्रकिनाऱ्यांवर इस्रायली पर्यटकांचे हार्दिक स्वाग्त होणार आहे. त्या ठिकाणचे आदरातिथ्य अत्यंत वाखाणण्याजोगे असल्याचे नवी दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाने म्हटले आहे. तसेच इस्रायलच्या राजदूतांकडून भारतातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.

इस्रायलच्या दूतावासाने ज्या सुंदर समुद्र किनारे असलेल्या पर्यटनस्थळांची छायाचित्रे जारी केली आहेत, त्यात सर्वात पहिल्या क्रमांकावर लक्षद्वीप आहे. यानंतर गोवा, अंदमान आणि निकोबार बेटसमूह तसेच केरळच्या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. इस्रायलच्या दूतावासाने जारी केलेल्या यादीत भारतातील प्रसिद्ध समुद्रकिनारे असलेली स्थळे आहेत. ही स्थळ कुठल्याही अर्थाने मालदीवपेक्षा कमी सुंदर नाहीत. लक्षद्वीपला तर मालदीव स्वत:च्या पर्यटनासाठी आव्हान म्हणून पाहत आहे. मालदीवच्या अत्यंत नजीक असलेले हा बेटसमूह नितांत सुंदर आहे.

विदेश मंत्रालयाकडून सल्ला जारी

इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने देखील मालदीवच्या निर्बंधांवर प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलच्या नागरिकांनी मालदीवचा प्रवास टाळावा असा सल्ला दिला जात आहे. यात विदेशी पासपोर्ट असलेले लोकही सामील आहेत. तर सध्या मालदीवमध्ये असलेल्या इस्रायली नागरिकांनी तेथून बाहेर पडण्याचा विचार करावा असे इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. मालदीवमध्ये दरवर्षी 10 लाखाहून अधिक पर्यटक पोहोचत असतात. यात इस्रायलचे जवळपास 15 हजार पर्यटक सामील आहेत. मालदीवची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने पर्यटनावरच अवलंबून आहे.

मालमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने

मुइज्जू सरकारने पॅलेस्टिनींसाठी निधी जमविणे आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनासाठी मुस्लीम देशांसोबत चर्चा करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसेच तेथे ‘मालदीव पॅलेस्टाइनसोबत’ या नावाने रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. पॅलेस्टाइनसोबत एकजुटता दर्शविणे हा आमचा उद्देश असल्याचे गृहमंत्री अली इहुसन यांनी सांगितले आहे. मालदीवची राजधानी माले शहरात महिन्याभरापासून इस्रायलच्या विरोधात निदर्शने होत आहेत. मालदीवचे लोक इस्रायलच्या नागरिकांवर प्रवेशबंदी घालण्याची मागणी दीर्घकाळापासून करत होते.

Advertisement
Tags :

.