महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऐकण्याचे शिक्षण

06:53 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात ऐकण्याने होत असते. जन्मदात्री आई त्या बाळाशी संवाद साधताना अनेक वाक्ये बोलते आणि त्यातले एकेक शब्द कानावर पडता पडता त्या बाळाला त्या भाषेची ओळख होते. आई जळगावमधील असेल तर तिथली बोली भाषा, बेळगावमधील असेल तर कन्नड आणि मराठी भाषा त्या बाळाला आपलीशी वाटते, आई जपानमधील असेल वा केनियातली, बाळाच्या कानावर जी पडते, तीच भाषा त्याला जवळची वाटते म्हणून ती मातृभाषा म्हणतात! पुढील काही वर्षेतरी त्या बाळाचे शिक्षण त्याच भाषेत झाले तर त्याला अनेक विषय समजू लागतात.

Advertisement

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा इंग्रजीपेक्षा अधिक जवळची वाटते, याचे कारण, हिंदी चित्रपटांमधून हिंदी भाषा वारंवार कानावर पडल्यामुळे आपल्याला हिंदी भाषा सवयीची वाटते, आपले कान उर्दू-पंजाबी मिश्रित हिंदी ऐकायला सरावतात. हिंदी भाषेमध्ये स्वत:च्या शब्दात निबंध लिहिणे कदाचित कठीण जात असेल परंतु हिंदी भाषा ऐकायला कठीण जात नाही. कारण ऐकण्याची क्षमता. जितकी वैविध्यपूर्ण हिंदी भाषा आपण ऐकतो तितकी ती भाषा आपल्याला जवळची वाटू लागते. इंग्रजी भाषेबद्दल नेमके उलटे घडते.

Advertisement

इंग्रजी

इंग्रजी भाषा शिकताना आपण मुळाक्षरे शिकतो, वाक्ये वाचतो, व्याकरण शिकतो परंतु आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्यरचना करणे कठीण जाते कारण आपण इंग्रजी ऐकतो फार कमी. यासाठीच इंग्रजी भाषा ऐकण्याचा सराव करायला हवा. त्याकरिता उत्तम माध्यम म्हणजे इंग्रजी चित्रपट ऐकणे. अनेक विषयांवर अनेक उत्तमोत्तम चित्रपट बघण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक विषयांवरची उत्तम व्याख्याने यु ट्यूब आणि पॉडकास्टवर उपलब्ध आहेत. डेव्हिड अॅटनबोरॉ यांच्या आवाजात जीवशास्त्र,

मॉर्गन फ्रिमन यांच्या आवाजात अंतराळ-जागतिक इतिहास ऐकताना त्या विषयाची गोडी लागतेच, शिवाय उत्तम इंग्रजी ऐकण्याची संधी मिळते. ब्रिटिश, अमेरिकन, स्कॉटिश अशा वेगवेगळ्या बोलीभाषेतील इंग्रजी ऐकल्यामुळे आपली इंग्रजी भाषेची कवाडे खुलतात आणि वारंवार ऐकल्यामुळे इंग्रजी भाषा आत्मसात करता येते.

भूतान असो वा नेपाळ, बिहारी असो वा पूर्वेकडील राज्यातील रहिवासी, भारतामध्ये काम मिळवण्यासाठी हिंदी भाषा आत्मसात करण्यासाठी चित्रपटांचा वापर करतात. ज्याची श्रवणभक्ती उत्तम, त्याला परकीय भाषा शिकण्याच्या संधी अफाट.

संगीत

लहानपणापासून संगीताचे विविध प्रकार ऐकायला मिळाले, म्हणजेच कानावर पडत राहिले, तर त्या व्यक्तीला संगीताची आवड लागते. पूर्वीच्या काळी घराघरांमध्ये रेडियो मोठ्याने लावला जायचा. त्यावर जुनी, नवी, देश-विदेशातील वेगवेगळ्या भाषांतली, वेगवेगळ्या प्रांतातील, गाणी जाणते-अजाणतेपणी ऐकली जायची. त्यामुळे अनेक कानसेन तयार झाले. त्यापैकी ज्यांनी रसिकता जपली ते रसिक श्रोते झाले. असे संगीत ज्या मुलांच्या कानावर निरंतर पडत राहते, त्यांना संगीताची चांगली जाण असण्याची शक्यता अधिक असते.

ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ऐकण्याची सवय अंगिकारावी, वाचन केल्यानंतर वाचून जे समजले ते दुसऱ्याला समजेल अशा भाषेत सांगावे, ऐकलेले एक वाक्य दुसऱ्या व्यक्तीला सांगितल्यावर त्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीस सांगण्याचे खेळ खेळून लक्षपूर्वक ऐकणे किती अवघड आहे याचा अनुभव घेत रहावे, एखादे व्याख्यान, कथाकथन, भाषण आपण किती वेळ लक्षपूर्वक ऐकू शकतो, याची स्वत:चीच परीक्षा घ्यावी, समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळा भिडवून संभाषण करावे आणि त्या संभाषणातून काय समजले याचे मुद्दे काढावेत, समोरची व्यक्ती बोलत असल्यास त्या व्यक्तीला न थांबवता लक्षपूर्वक ऐकल्यानंतर आपले म्हणणे मांडावे, एखादे व्याख्यान ऐकल्यावर आपल्याला काय समजले ते आपल्याच मित्रांना सांगावे. पालकांनी गोष्टी वाचून दाखवाव्यात, पाकक्रिया वाचून दाखवण्यास आपल्या पाल्याला सांगावे आणि त्यानुसार पाककृती करावी. असे प्रयोग केल्यामुळे सजगपणे ऐकण्याचा सराव होतो.

ऐकण्याला वाचनाची जोड

आज अनेक शालेय विद्यार्थी शिक्षकांच्या शिकवण्यावर बरेच अवलंबून असतात. म्हणजेच शिक्षकांनी जे सांगितले त्याची श्रवणभक्ती करून तेच आठवून परीक्षा देतात. ऐकण्याला वाचनाची जोड हवीच. श्रवण करताना एकाच व्यक्तीचे वक्तव्य प्रमाण मानू नये, त्याला अनेक मत-मतांतरे असलेल्या व्यक्तींचे ऐकण्याची, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाची जोड हवी. शांतपणे ऐकल्यावर, त्याबद्दल प्रश्न विचारावेत, जे ऐकले त्याचा सारांश पाच वाक्यात स्वत:च्या शब्दात सांगता यावा.

बहुश्रुत

अनेक भाषा, अनेक संगीतप्रकार, अनेक विषयांची सखोल माहिती असलेल्या व्यक्तीस बहुश्रुत म्हटले जाते. भारतीय परंपरेमध्ये विद्वान आणि बहुश्रुत असणे हे उत्तम राजाचे लक्षण मानले गेले आहे.

उत्तम ऐकणारा उत्तम नेता (लीडर या अर्थाने) होऊ शकतो. हाताखाली सर्व पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे ऐकणाऱ्या नेत्याला सर्व प्रश्नांची जाण असते. बहुश्रुत बनण्याचे शिक्षण शालेय शिक्षणाच्या कार्यकक्षेबाहेर आहे.  त्यामुळे बहुश्रुत बनवण्यासाठी पालकांनी सजगपणे प्रयत्न करायला हवेत.

सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article