शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे- राष्ट्रवादीतील नेत्यांचे वक्तव्य
मुंबई
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १२ डिसेंबर रोजी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. ही भेट कौटुंबिक होती, पण त्याकडे मात्र राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते अंकुश काकडे यांनी वक्तव्य केले.
१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस दिल्लीत साजरा करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत आले आहेत. तर अजित पवार त्यांच्या कामानिमित्त दिल्ली आले होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. वाढदिवसानिमित्त शरद पवारांना भेटून अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या ही बाब चांगलीच आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येतील, अशी कार्यकर्त्यांचीही सद्भावना आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करवां अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तसंच झालं तर आनंदाची गोष्ट असेल, असे वक्तव्य अंकुश काकडे यांनी केले.
तर याप्रसंगी सुनंदा पवार म्हणाल्या की, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काहीही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबामध्ये मतभेद असतातच. भविष्यात ते एकत्र येतील, मतभेद मिटतील अशी माझी इच्छा आहे. मुठ घट्ट असेल तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहु तर ती ताकद कमी होते. पण कोणी कोणासोबत जायचं, यासंदर्भातील निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा.