For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेते प्रचारात ,उमेदवार वेटींगवर तर शेतकरी व्हेंटिलेटरवर

06:31 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेते प्रचारात  उमेदवार वेटींगवर तर शेतकरी व्हेंटिलेटरवर
Advertisement

लोकसभा निवडणुकीत मतांचा पाऊस पडावा यासाठी नेते प्रचारात व्यस्त आहेत. राज्यातील काही भागात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले तर, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत एप्रिलच्या मध्यातच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून काही ठिकाणी अद्याप राजकीय तिढा कायम असल्याने सध्या राज्याचे चित्र हे नेते प्रचारात, उमेदवार वेटींगवर आणि शेतकरी व्हेंटिलेटरवर असेच आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना दुसरीकडे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद होताना पाहायला मिळत आहे. जस जसा निवडणुकीचा प्रचार शिगेला जाईल तशी राज्यातील पाण्याची पातळी ही खाली गेल्याचे पहायला मिळेल. त्यात निवडणूक आचारसंहिता असल्याने दुष्काळ नियोजनाच्या कामासाठी प्रशासकीय पातळीवर मर्यादा येणार आहे.

एकीकडे राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत. त्यामुळे दुष्काळ निवारणाच्या कामासाठी सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होणार का? हाच मोठा प्रश्न येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागात असणार आहे. त्यात निवडणूक आचारसंहिता लागली असल्याने स्थानिक पातळीवर कुठल्या राजकीय नेत्याने पाण्याचे टँकर दिले तरी तो आचारसंहिता भंग होऊ शकत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ पण पाणी कुठेच नाही अशी होणार आहे.

Advertisement

राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रात दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय, उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची पातळी घटली असून धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. शेतकऱ्यांप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असून पशुधन वाचविण्याचे मोठे संकट येत्या काही दिवसात उभे ठाकेल अशी सध्याची परिस्थिती दिसत आहे. उन्हाच्या तीव्र झळा बसण्यापूर्वी पहिल्या दोन टप्प्याचे मतदान झालेले असेल. मात्र तिसऱ्या टप्प्याच्या उमेदवारांना आणि नेत्यांना आपला करिष्मा करत असताना दुसरीकडे उष्मा पण सहन करावा लागणार आहे.

विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी होणाऱ्या पाच जागांसाठी भाजप, काँग्रेससह इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदर्भात प्रचारसभा घेतल्या. मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरीही तो तेव्हढ्यापुरताच होता. राज्याच्या अनेक भागातून पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून धरणे, तलाव आटल्याने एप्रिलच्या सुरूवातीलाच टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे.

प्रमुख धरणांचा गेल्यावर्षी याच काळात असलेला पाणीसाठा पाहिला तर जायकवाडीतील धरणसाठा 16 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी याच काळात जायकवाडीत 52 टक्के पाणीसाठा होता. मराठवाड्यात गतवर्षी 42 टक्क्यांवर असलेला  पाणीसाठा यंदा फक्त 16 टक्क्यांवर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात गतवर्षी 39 टक्के असलेला  पाणीसाठा यंदा 31 टक्क्यांवर आला आहे.

कोकण आणि विदर्भातील पाणीसाठ्याची परिस्थिती तुलनेने बरी आहे. राज्यातील सर्व महसुली विभागात मार्च अखेरपासूनच टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली असून मराठवाड्यातील आठ पैकी पाच जिह्यातील 497 गावे आणि 150 वाड्या अशा तब्बल 647 गावांना 763 टँकरने, तर प. महाराष्ट्रातील सोलापूर जिह्यात 36 गावांना 40 टँकरने, तर सातारा जिलह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक तलावांसह बोअरवेलची पाणी पातळी खालावल्याने जिह्यात 156 गावे आणि 560 वाड्यांना 157 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अशीच काहीशी परिस्थिती कोकण वगळता सर्वत्र असून पुढील दोन ते अडीच महिने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने, प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्याची तयारी सुरू केली पाहीजे. हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार मान्सून 8 जुनला भारतात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे अजून किमान 3 महिने असल्याने भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेता आतापासूनच पाणी टंचाई आणि दुष्काळ निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिक आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारला अधिकार असताना त्वरीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले जायचे, सरकारने आदेश दिल्यानंतरही प्रशासन ढिम्म असल्यास प्रसंगी लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवत असत. मात्र आता आचारसंहिता असल्याने या नुकसानीचे पंचनामे कधी होणार? हा प्रश्न आहे. इतर वेळी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणणारे मात्र आता लोकसभा निवडणुकीत एकमेकांना अडवण्यात आणि जिरवण्यात व्यस्त झाले आहेत. सध्या नेते प्रचारात तर शासन निवडणुकीच्या कामात आहेत. काही मतदार संघातील उमेदवार अजुनही वेटींगवर असल्याने उमेदवारीसाठी दिल्ली, मुंबई वाऱ्या करणारे या उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी वारी केल्याचे पाहिले नाही. त्यामुळे नेते प्रचारात असताना, उमेदवार वेटींगवर आहेत, पण गेल्या दहा वर्षातील हवामान बदलाचा त्रास सहन करीत शेती करणारा शेतकरी मात्र पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे व्हेंटिलेटरवर आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.