गणेश चतुर्थीच्या भेटीने नेते अन् भक्तही सुखावले
गणेश चतुर्थीच्या आनंदात यंदा भरच पडली. बेकायदा घरांना कायद्याच्या संरक्षणाच्या आमिषाने भक्त सुखावला आहे. सभापती रमेश तवडकरांचे ‘श्रमधाम’ म्हणजे पुण्यकर्मच. त्यांनी गरजूंना चतुर्थीची भेट दिली. आमदार दिगंबर कामत आणि तवडकर यांना प्राप्त झालेला मंत्रिपदाचा सन्मान हीसुध्दा गणेश चतुर्थीचीच भेट, मंत्री माविन गुदिन्होंची वीज घोटाळ्यातून मुक्तता हीसुध्दा श्रीगणेशाची कृपा असेच त्यांना वाटेल. एवढेच नव्हे तर पुढेही मंत्रीमंडळात बदल होण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत काहींच्या चतुर्थीच्या आनंदात भर घालणारेच ठरले. अशा गोड वार्तांनी भडकलेल्या नारळांच्या दरांची चिंताही हलकी केली. आतापासून पुढील दोन वर्षे निवडणुकांची आहेत. पुन्हा ‘कामतांचे मंत्रीमंडळ सत्तेवर’ हा विजयचा टोमणा भाजपने गांभिर्याने घ्यायला हवा.
मागचे दीड वर्ष ज्या मंत्रीमंडळ बदलाची चर्चा होती, ती अखेर खरी ठरली. त्यासाठी इच्छुकांना फार-फार प्रतीक्षा करावी लागली. यापुढेही बदलाचे संकेत देऊन मुख्यमंत्र्यांनी काही असंतुष्टांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोव्यात आतापासून पुढील दोन वर्षे निवडणुकांचीच असणार आहेत. विधानसभा निवडणुका सोळा महिन्यांवर आलेल्या आहेत. त्यापूर्वी येत्या डिसेंबरपर्यंत जिल्हा पंचायत निवडणुका होतील. त्यानंतर मे महिन्यापर्यंत पालिका निवडणुका होतील आणि विधानसभा निवडणुकीनंतरच्या चार महिन्यांत पंचायतींच्या निवडणुका होतील. त्यामुळेच भाजप धडपडत आहे. नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे. जनतेला मुठीत पकडायचा प्रयत्न पावला-पावलांवर होत आहे. ‘माझे घर’ हा त्यातलाच एक प्रयत्न. खरे किती अन् खोटे किती, हे वेळ येताच कळून येईल. तोपर्यंत बहुसंख्य मतदार जोडण्याची सोय होऊ शकते. इथल्या काँग्रेसला मात्र राहुल गांधीच्या इशाऱ्यावर वोट चोरीचा शंख करावा लागत आहे, ज्याने जनतेच्या मनावर काडीचाही परिणाम होणार, असे वाटत नाही. त्यापेक्षा काँग्रेसने जनतेच्या अडचणींना हात घालावा, हेच भल्याचे ठरेल.
काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि पुन्हा भाजप असा प्रवास केलेल्या आमदार दिगंबर कामत यांना भाजपने मंत्रिपदाची बक्षिसी देऊन त्यांचा उचित सन्मान केला. भाजपचे आमदार बनण्यापूर्वी दिगंबर कामत काँग्रेसमध्ये होते. त्यांनी 89 साली काँग्रेसमधून आमदार बनण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचे स्वप्न 94 साली भाजपमधूनच साकार झाले. तिसऱ्यांदा आमदार बनल्यानंतर त्यांनी भाजपला दगा दिला व पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार बनले. पुढे त्या पक्षाने त्यांना पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी ठेवले. भाजपने 35 हजार कोटींच्या खाण घोटाळ्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला. त्यानंतर भाजप सत्तेवर आला मात्र दिगंबर कामतांचे काहीही बिघडवू शकला नाही. घोटाळा हवेतच विरला. विरोधकांमध्ये राहून कामतांची पुन्हा घुसमट होऊ लागली होती. मागच्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याची स्वप्नेही धुळीस मिळाली. त्यामुळे आता आणि घुसमट सहन करायची नाही, असे ठरवून ते साथीदारांसह भाजपमध्ये सामील झाले. राजकारणात त्यांनी केलेला हा दुसरा विश्वासघात. 2005 साली स्व. मनोहर पर्रीकरांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले होते. तेव्हा मोदी नव्हते आणि शहाही नव्हते. आई-वडिलांनी ठेवलेले ‘दिगंबर’ हे नाव इतक्या लवकर सार्थ ठरवेल, असे वाटले नव्हते, अशी निर्भत्सना दिगंबर कामतांना उद्देशून स्व. प्रमोद महाजन यांनी मडगावच्या सभेत त्यावेळी केली होते. कलंकित इतिहासानंतर घडलेल्या नव्या राजकीय घडामोडींनी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल काय? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.
नव्या भाजपने उशिरा का होईना, मोठ्या मनाने दिगंबर कामत यांना मंत्रिपदाची बक्षिसी बहाल केली. कदाचित भाजपला मडगावमध्ये धोका जाणवत असावा. पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द पूर्ण केलेला नेता पुन्हा मंत्री म्हणून एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करतोय, हे मात्र पचनी पडणारे नाही. राजकारणात लाज-लज्जा बाळगायची नसते, तेच खरे असावे. काँग्रेसच्या काळात कसलाच विकास झाला नाही, हा भाजपचा आरोप काँग्रेसच्या काळात पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या दिगंबर कामत यांना आता मान्य करावा लागणार आहे. आजच्या भाजप सरकारच्या मंत्रीमंडळातील बहुतेक मंत्री हे दिगंबर कामतांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील मंत्री आहेत. आमदार विजय सरदेसाई यांनी जी टीका केली, ती सार्थच आहे. मंत्री दिगंबर कामतांबरोबरच भाजपनेही आता वर्तुळ पूर्ण केलेले आहे. काँग्रेसीकरणाच्या पलीकडचा पल्ला भाजपने गाठला आहे. हे थोडे गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.
आलेक्स सिक्वेरा यांच्यासाठी नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले. अन् जवळपास दोन वर्षांनी आरोग्याच्या कारणास्तव आलेक्स सिक्वेरांना मंत्रिपद सोडविण्यास भाग पाडण्यात आले. आमदार गोविंद गावडे यांना बेशिस्ती नडली. मंत्री कामत आणि तवडकर यांना गणेश चतुर्थीची भेट मिळाली. पुढील सोळा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. शेवटचे चार महिने सोडल्यास जेमतेम एका वर्षांत हे नवे मंत्री कोणते दिवे लावतील, हा सुद्धा प्रश्नच आहे.
या गणेश चतुर्थीत आणखी एक बहुचर्चित मंत्री माविन गुदिन्हो यांना भेट मिळाली. न्यायालयाने त्यांना त्यांच्याविरुद्ध 27 वर्षे चाललेल्या वीज घोटाळ्याच्या खटल्यातून दोषमुक्त केले. न्यायालयाने त्यांच्या कपाळावरील कलंक पुसला आहे. त्यांच्यासाठी यंदाची गणेश चतुर्थी अपार आनंदाची ठरेल, यात शंकाच नाही. तत्कालीन विरोधी पक्षनेते स्व. मनोहर पर्रीकर 27 वर्षांपूर्वी वीज घोटाळा प्रकरणात मंत्री माविन गुदिन्हो यांच्यामागे हात धुवून लागले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. कैद टाळण्यासाठी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागला होता मात्र मंत्री गुदिन्हो यांनी न्यायालयात निर्दोष सिद्ध होताच स्व. मनोहर पर्रीकरांना ‘क्लीन चिट’ दिली, हे विशेष. पर्रीकरांची या प्रकरणात काही चूक नव्हती. काँग्रेसच्या नेत्यांनीच त्यावेळी आपले पाय ओढण्यासाठी हे षड्यंत्र रचले होते, अशी एक नवीन माहितीही मंत्री माविन गुदिन्हो यांनी लोकांसमोर ठेवली. काही लोकांना हा विनोदही वाटू शकतो. तसे माविन गुदिन्हो व मनोहर पर्रीकर 2012 पासूनच एकमेकांना जवळ आले होते. काँग्रेसमध्ये राहूनच त्या पाच वर्षांत माविन गुदिन्हो यांनी भाजपला बरेच सहकार्य केले होते. पुढे पर्रीकरांमुळेच 2017 मध्ये ते भाजपवासी झाले. त्यांना भाजपने निवडूनही आणले. माविनसाठी 25 वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी कटू होत्या. परंतु त्या उकरून काढणे आता शक्यच नाही. एक मात्र खरे, कटू आठवणींचा शेवट त्यांच्यासाठी गोडच झाला.
अनिलकुमार शिंदे