नेते, कार्यकर्ते आकडेमोडीत दंग
मतदारसंघातील परिसरनिहाय आकडेवारीतून मतदानाचा अंदाज व्यक्त
कोल्हापूर
विधानसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच मतदारसंघात चुरशीने मतदान झाले आहे. मतदानानंतर समोर आलेल्या टक्केवारीनुसार आता नेते, कार्यकर्ते आकडेमोडीत दंग असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील परिसरनिहाय आपल्या उमेदवाराला किती मतदान झाले याचे अंदाज वर्तवले जात असून ते किती मतांनी निवडून येतील याचा ठोकताळा देखील मांडला जात आहे.
कोल्हापुरातील दहाही मतदार संघातील निवडणूक चुरशीची बनली आहे. काही मतदान संघात दुरंगी तर काही मतदार संघात तिरंगी लढत आहे. बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रशासनाकडून मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी जाहीर झाली आहे. या जाहीर झालेल्या टक्केवारीनंतर प्रत्येक मतदारसंघात झालेल्या मतदानाचे अंदाज वर्तवले जात आहे. मतदार संघातील परिसरनिहाय अंदाज व्यक्त केले जात आहेत. मतदार संघातील परिसर, पेठनिहाय, गाव निहाय असलेली उमेदवारांच्या संपर्कावर त्या परिसरात किती मते मिळणार याचे अडाखे बांधले जात आहेत.
निकालापूर्वीच विजयाचे दावे, प्रतिदावे
कोल्हापुरातील दहा मतदार संघात बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यानंतर झालेल्या मतदानाच्या आधारे सर्वच उमेदवाराकडून विजयाचे दावे केले जात आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का अथवा कमी झालेल्या टक्क्यावरूनही अंदाज व्यक्त होत आहे. सोशल मिडीयावरही परिसर निहाय मतदानाची टक्केवारी व्हायरल करून त्यामध्ये आपल्या नेत्याला किती टक्के पडतील याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मयत मतदारांच्या नोंदी कायम, मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने तयार केलेल्या मतदार यादीमध्ये मयत व्यक्तींची नावे रद्द केलेली नाहीत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. मतदार यादीत चुका, दुबार मतदारांच्या नोंदी कमी केल्या नसल्यामुळे त्या व्यक्तींच्या मतदानाची नोंद होत नाही त्यामुळे टक्केवारीतही घट होणार आहे.