स्थानिक निवडणुकीत शक्य तेथे आघाडी
कोल्हापूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ज्या ठिकाणी शक्य होईल, तिथे आघाडी करणार असल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. या निवडणुकांसंदर्भात 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे स्पष्ट होईल असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी म्हणून एकत्र असताना देखील अनेक महापालिका निवडणूका वेगवेगळ्या लढवल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे आघाडी करायची अशी आमच्या तिन्ही पक्षाची भूमिका आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आघाडी म्हणून भूमिका ठरवताना आम्ही एकत्र बसून धोरण ठरवू. कोल्हापुरात आमची आघाडी व्हायला काही अडचण येणार नाही, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
विधानसभा आणि महानगरपालिकेचा पॅटर्न वेगळा आहे. मुंबई महानगरपालिकेत पूर्वी काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरे यांची देखील सत्ता राहिली आहे. सध्या राज्यातील जनता प्रशासनाच्या कारभाराला कंटाळलेली आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेवर ठेवलेल्या कंट्रोलला जनता कंटाळली आहे. यामुळे जनता आमच्या बाजूने असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या चांगल्या कामाला कोणी पाठिंबा देणार नाही असे होणार नाही. मात्र विरोधक म्हणून चुकीच्या कामावर बोट ठेवणे ही आमची जबाबदारी असते. अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावरून आम्ही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू, असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आरोपी अटक झाले आहेत. मात्र चार्जशिट मध्ये काय येते, त्यामध्ये आरोपींना सुटायला मदत होईल की शिक्षा व्हायला मदत होईल हे कळणार आहे. यामध्ये सरकारची भूमिका किती प्रामाणिकपणे आहे हे दिसेल. सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भात जे दोन जीआर काढले होते, त्यासंदर्भात शासन स्पष्टपणे बोलत नसल्याचाही आरोपही त्यांनी केला. तर सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी पालकमंत्री मिळालेला नाही. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये एकमत नसल्याने महायुतीचे घोड अडलेल आहे, अशी टीकाही त्यांनी केली.