Kupwad LCB Raid: 10 लाख रुपयांची मागणी करणारा मनपा उपायुक्त लाचप्रकरणी अटकेत
फेब्रुवारीपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून होता.
सांगली : शहरात 24 मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी 10 लाखाची लाच मागून सात लाखावर तडजोड केल्याचे सरकारी पंचाच्या निदर्शनास आल्यानंतर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी दाखल चौदा पानी फिर्यादीमध्ये तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावतीने आपण लाच मागत असल्याचा उल्लेख आल्याने वादग्रस्त आयएएस अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारीपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून होता.
सोमवारी दुपारच्या सुमारास साबळे यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली. पण त्याची माहिती सायंकाळी उघडकीस आली. त्यानंतर महापालिकेच्या मंगलधाम इमारतीत खळबळ माजली. प्रकरणाशी संबधित अनेक लोक गायब झाले. तर सांगली आणि मिरज मुख्यालयाच्या परिसरात काही कंत्राटदारांनी फटाके वाजवून या कारवाईचे स्वागत केले.
24 मजली इमारतीचे प्रकरण
युनिफाईड डीसीआर मंजूर झाल्याने महापालिका क्षेत्रात 31 मजल्यापर्यंत उंच इमारती बांधण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या इमारतींना लागणारे परवाने देण्यात मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. त्यातूनच फेब्रुवारीत दाखल झालेल्या 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी लाचेचा खेळ सुरू झाला.
पहिल्या टप्प्यात या प्रकरणी 10 लाखाच्या लाचेची मागणी करण्यात आली. 17 फेब्रुवारी रोजी तक्रारदाराने तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावतीने उपायुक्त वैभव साबळे हे लाच मागत असल्याची तक्रार दाखल केली. ही तक्रार सांगलीत दाखल न करता थेट मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयात दाखल करण्यात आली.
25 फेब्रुवारी रोजी या विभागाच्या पडताळणीमध्ये बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी स्वत:साठी दहा लाख रूपये द्यावेत अशी मागणी केली. याप्रकरणात पोलिसांनी वेळोवेळी तयारी करत अखेर सोमवारी 9 जून रोजी अंतिम कारवाई हाती घेतली. तडजोडीअंती सात लाख रूपये मागत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार वैभव साबळे यांना अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या लॉकअपमध्ये रवानगी करण्यात आली. याप्रकरणी उपअधीक्षक अनिल कटके, तत्कालीन उपाधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे व कर्मचाऱ्यांच्या सापळा पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील गाय खरेदी प्रकरणात आधीच अडचणीत आलेले आयएएस अधिकारी शुभम गुप्ता हे आयुक्त म्हणून बदली होण्यापूर्वी या प्रकरणात देखील गुंतल्याचे दिसून येत आहे. तक्रारदारांशी झालेल्या संभाषणात उपायुक्त साबळे यांनी आपण ही रक्कम आयुक्त शुभम गुप्ता यांच्या सांगण्यावरून मागत आहे असे म्हटले आहे.
चौदा पानी फिर्यादीत याचा अनेकदा उल्लेख आला आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याप्रकरणी तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.