For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपवर नाराज,पण श्रीपादभाऊंच्या विरोधात नाही!

11:56 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपवर नाराज पण श्रीपादभाऊंच्या विरोधात नाही
Advertisement

पणजी : गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे परवा रात्री आपल्याला येऊन भेटले, चर्चाही केली. परंतु त्यांनी ना आपल्यास पक्षात परतण्याची विनंती केली ना पक्षाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्यासाठी पाठिंबा मागितला, असे निवेदन करून माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु श्रीपाद नाईक यांच्यावर आपण मुळीच नाराज नाही, असेही निवेदन केले. पार्सेकर व तानावडे यांच्या भेटीवरून राज्यात चर्चेचा विषय झाल्यानंतर पत्रकारांनी तानावडे यांना याबाबत विचारले असता तानावडे यांनी एक निवेदन केले की, आपण पार्सेकर यांच्याशी चर्चा केलेली आहे. आता भाजप व श्रीपाद नाईक यांना पाठिंबा देण्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावयाचा आहे.

Advertisement

पक्षा या, असे निमंत्रण देत नाही

याबाबत पार्सेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, आपल्याबाबत भाजप नेते उलटसुलट निवेदने करतात. काहीवेळा ते म्हणतात की, आपण पक्षाचा ज्येष्ठ नेता त्यामुळे आम्ही त्यांच्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा असतो. नंतर हेच नेते म्हणाले की, पार्सेकर आमच्याबरोबर नसलेतरी त्यांचे समर्थक आमच्याबरोबर आहेत. अनेक गुन्हे त्या व्यक्तीच्या नावावर नोंदविलेले आहेत, अशा नेत्यांना पक्षात प्रवेशासाठी हीच मंडळी त्यांच्या समोर पायघड्या घालतात. आपण पक्षासाठी एवढे कार्य केले. पण आता आम्हाला तुमची गरज आहे, पक्षात या, असे निमंत्रण देत नाही.

Advertisement

कदाचित माझी गरज नसावी

मी पक्षात फेरप्रवेश करणे वा ना करणे, हा विषय वेगळा. परवा तानावडे रात्री उशिरा घरी आले. त्यांनी सांगितले की, आम्ही दोन्ही ठिकाणी निवडणुका जिंकतोय. जनतेचा उत्तम पाठिंबा मिळतोय, असा अहवाल दिला. मी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, कोणत्याही परिस्थिती या व्यक्तीने पाठिंबा अथवा आशीर्वाद मागितले नाहीत. कदाचित त्यांना माझी गरज नसावी.

श्रीपाद नाईकांच्या विरोधात नाही

परिस्थिती अशी असली तरीदेखील आपण श्रीपाद नाईक यांच्या विरोधात नाही. त्यांच्यावर आपला कोणताही राग नाही. आपण त्यांच्या पक्षालादेखील त्रास देऊ इच्छीत नाही. मात्र गेल्यावेळी आपल्याला आव्हान दिले म्हणून आपण मागील विधानसभा निवडणुकीत उभा राहिलो, असेही लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.

Advertisement
Tags :

.