For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खटला आणि कुरबुरी भाजपच्या पथ्यावर!

06:26 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
खटला आणि कुरबुरी भाजपच्या पथ्यावर
Advertisement

Advertisement

मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा खटला, महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या कुरबुरी भाजपच्या पथ्यावर पडल्या आहेत. शिवसेनेचा 23 चा आग्रह, महाराष्ट्र कॉंग्रेसची कुरघोडी, पवारांचे मौन, आंबेडकरांची अवास्तव मागणी आणि शिंदे सेनेतील खासदारांना कमळाचे आकर्षण भाजपसाठी वाट सोपी करणारे ठरत आहे.

राज्यातील सगळे पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीत दिल्लीतच उद्धव ठाकरे यांनी 31 डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची मागणी केली होती. इतक्या कमी काळात हा तिढा राज्यात सुटणार नाही हे स्पष्ट होते. राज्यातील काँग्रेस नेत्यांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली पण काँग्रेसमध्ये नाही हा भांडवलाचा भाग. कोणत्याही निर्णयाच्या आडवे पडण्यास ते हा मुद्दा उचलणार याची जाणीव होतीच. त्यामुळे सत्ता असलेल्या राज्यात मित्रपक्षांना डावलायला जाऊन सत्ता गमावून बसली  हे वास्तव मांडून राज्यातील नेत्यांकडे निर्णयाचे कितपत अधिकार ठेवायचे याचा विचार करण्याचे राहुल गांधी यांना सुचवले. मात्र आपण 23 जागा लढवणार आहोत अशी यादी त्यांनी काँग्रेसकडे पाठवून दिली आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांनी कान टवकारले. प्रकाश आंबेडकर यांच्यावर राज्यातील नेत्यांचा विश्वास नाही.

Advertisement

अडचणीच्या मागण्या करून ते नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि मान्य होणार नाहीत अशा मागण्या करतात. हे करून ते एकप्रकारे भाजपचा लाभ करतात आणि ऐनवेळी काँग्रेसचे उमेदवार पराभूत करण्यासाठी भाजप त्यांच्या शक्तीचा उपयोग करून घेतो हा या नेत्यांचा अनुभव आणि आरोप आहे. तरीही हा मुद्दा राज्यातील नेत्यांना वगळून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र आंबेडकर यांनी खर्गे यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीला पत्र पाठवून चार पक्षात प्रत्येकी 12 समान जागांचे वाटप करण्याची मागणी केली. तसे केल्याने मतभेद दिसणार नाहीत आणि जागा वाटपावरून नकारात्मकता पसरणार नाही असे त्यांनी कळवले. हे कळवणे सार्वजनिक करण्यात आले आहे हे त्याहून विशेष!

याचवेळी संजय निरुपम यांनी ठाकरे सेनेने केलेल्या 23 लोकसभा जागांच्या मागणीचा समाचार घेत तेवढे उमेदवार तरी त्यांच्याकडे आहेत का? असा बोचणारा प्रश्न केला. निरुपम आणि ठाकरे सेनेचे विळ्या भोपळ्याचे नाते. त्याचा फायदा घेऊन काँग्रेसचे इतर नेते त्यांच्या मागे लपून हा हल्ला होऊ देत आहेत हे उघड आहे. त्यांना राज्याच्या जागावाटपात स्वत:चा सहभाग हवा आहे.

शिवसेना दिल्लीत बरोबरीची चर्चा करण्यास उत्सुक आहे आणि पवारांना सगळे निर्णय दिल्लीतच होतात हे माहिती असल्याने ते गप्प आहेत. त्यांच्या गप्प असण्याने काँग्रेसनेते हैराण आहेत. त्यांना जुने उट्टे काढायची संधी मिळेना. नागपूरची राहुल गांधी यांची रॅली काँग्रेस स्थापना दिनाची होती. त्यात ते जे बोलले त्याला महत्त्व आहे. पण, राज्यातील सगळे काँग्रेस नेते आणि विदर्भातील प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते असून आणि पूर्ण राज्यातून लोकांना बोलावून देखील जी गर्दी होती ती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या मानाने तुरळक ठरावी अशीच होती.

विदर्भ भाजपच्या हातून हिसकावून घेण्याची तयारी करणारे हे विदर्भातील काँग्रेस नेते मतदारांना आपल्या सभेपर्यंत आणू शकत नाहीत हे वास्तव लक्षात घेतले तर मतदार काँग्रेसकडे सरकत असला तरी नेते मतदारापर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यांचा भर फक्त काड्या करणाऱ्या राजकारणावर आहे, हेच दिसून आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी त्याच मुद्यावर टीका केली.

राजकारण हा जर आकड्यांचा आणि प्रतिमेचा खेळ असेल तर काँगेस नेते आपल्या कर्माने या खेळाचा विस्फोट करत असतात असे म्हणण्यास वाव आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नेते एकीकडे आपणास मोदींची सत्ता घालवायची आहे, त्यासाठी तडजोडीची तयारी आहे असे म्हणतात आणि चर्चा सुरू होण्याआधीच त्यात अडथळे ठरणाऱ्या मागण्या करतात. हाच हट्ट गेल्या लोकसभा, विधानसभेला त्यांना शून्यावर ठेऊन गेला. आपल्या मतांनी दोन्ही काँग्रेसचे नुकसान केले, पण घडवले काय? त्यातून त्यांच्या पक्षाला लाभ झाला की आठवले यांचे आसन अधिक बळकट झाले याचा विचार बहुदा ते करत नसावेत. मात्र या सगळ्या कुरबुरीमुळे त्यांना ज्या भाजपला अस्वस्थ करायचे होते ते अधिक निवांत झाले आहेत.

अपत्रतेचा खटला एकीकडे शिंदे सेनेला शांत ठेवण्यास उपयुक्त ठरतो आहे तर दुसरीकडे अपेक्षा वाढलेल्या अजित पवार यांना शरद पवार यांच्यावर कडवी टीका करण्यास भाग पाडत आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 जणांना अपात्र ठरवले तर स्ट्राँग मराठा म्हणून आपलाच विचार होईल असे दादांना वाटते. त्यामुळे ते अधिक कडवट टीका करत आहेत. तर नार्वेकर यांचा निकाल आपल्याच बाजूने लागेल, नाहीतर सुप्रीम कोर्टात वेळ जाईलच या आशेवर शिंदे सेना आहे. ती आशा जिवंत ठेवायला मुख्यमंत्री आपल्यासोबत आलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा काढणार आहेत. त्यांच्या पक्षातील काही खासदार रिस्क घेण्यास तयार नाहीत. विविध कंपन्यांच्या निकालांचे निवडणूकपूर्व अंदाज त्यांना कमळ चिन्हावर लढण्यास प्रेरित करत आहेत.

मुख्यमंत्री हे शिंदे असेल तरी त्यांच्याकडे कवायती फौज नाही. ती भाजपकडे सर्व मतदार संघात आहे. त्यासह इतर ताकद थेट मिळेल असे खासदारांना वाटते. अजितदादांना किती जागा हव्यात ते एकदा त्यांच्याही नकळत तोंडातून निघून गेले आहे. त्यामुळे भाजपला जागा वाटपात फार ओढाताण करावी लागेल अशी लोकसभेच्या बाबतीत तरी चिन्हे नाहीत. त्यात त्यांना काही खासदार घरी बसवायचे आहेत त्यासाठी त्यांना वेळ मिळाला आहे. विधानसभेलाच त्यांची डोकेदुखी वाढू शकते. आचार संहिता लागू होऊ पर्यंत अशी अनेक वळणे येत राहणार. क्लायमॅक्स कसा असेल याचा अंदाज त्यामुळे अजूनही येताना दिसत नाही.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.