लॉरेन्स वोंग सिंगापूरचे नवे पंतप्रधान
अर्थतज्ञाकडे देशाची धुरा : पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
वृत्तसंस्था /सिंगापूर
अर्थतज्ञ लॉरेन्स वोंग यांनी सिंगापूरचे चौथे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. 51 वर्षीय वोंग हे 72 वर्षीय ली सीन लूंग यांची जागा घेणार आहेत. 20 वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यावर ली सीन लूंग यांनी स्वत:चे पद सोडले आहे. तसेच यापूर्वीचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री राहिलेले लॉरेन्स वोंग यांच्याकडे सत्तेची धुरा सोपविली आहे. वोंग सरकार उद्योगांसाठी अनुकूल धोरणे कायम ठेवणार अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. उद्योगांसाठी अनुकूल धोरणांमुळेच सिंगापूर हे आशियातील वित्तीय अन् व्यापाराचे केंद्र म्हणून नावारुपाला आले आहे. सिंगापूर हा भारताचा आठव्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. नवे पंतप्रधान वोंग यांच्या नेतृत्वातही भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होत राहणार असल्याचे सिंगापूर इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे म्हणणे आहे. वोंग यांनी सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आमची रणनीतिक भागीदारी वृद्धींगत करण्यासाठी वोंग यांच्यासोबत मिळून काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.
लॉरेन्स वोंग यांची पार्श्वभूमी
18 डिसेंबर 1972 रोजी जन्मलेल्या वोंग यांची पार्श्वभूमी सर्वसाधारण कुटुंबाची आहे. वोंग यांनी विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सिंगापूरच्या प्रशासनात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. 2011 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. पीपल्स अॅक्शन पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. वोंग यांना सिंगापूरगच्या मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात नियुक्त करण्यात आले होते. यानंतर त्यांनी संस्कृती, राष्ट्रीय विकास आणि शिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. 2021 मध्ये ते अर्थमंत्री आणि एक वर्षानंतर उपपंतप्रधान झाले होते. ली यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.