For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरवळीवरचं टेनिस

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिरवळीवरचं टेनिस
Advertisement

विनायक भोसले /कोल्हापूर

Advertisement

विम्बल्डनचे दिवस सुरु झालेले आहेत. दरवर्षी जुलै महिन्यामध्ये ब्रिटिश उन्हाळा सुरू होतानाच्या काळात सुरू होणारा हा टेनिसप्रेमींचा जागतिक शाही सोहळा, 147 वर्षाची भव्य परंपरा असलेला.2 जुलैपासून लंडनजवळच्या छोट्या उपनगरात सुरू झालेली विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा ब्रिटिशांच्या परंपरेचाच एक भाग. हिरवळीवर स्पर्धा घेणं, खेळाडूंना पांढऱ्या शुभ्र कपड्यांची सक्ती या परंपरावादी अटी असल्या तरी तंत्रज्ञान आणि आयोजनाच्या सोयीसुविधांमध्ये सातत्याने आधुनिकता आणल्यामुळे आजही ही स्पर्धा टेनिस जगतात प्रतिष्ठेची आणि पहिल्या क्रमांकाची आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेला तब्बल 147 वर्षांचा गौरवशाली असा इतिहास आहे.जगभरातल्या अनेक युवा व अनुभवी टेनिसपटूंसाठी ही स्पर्धा म्हणजे पर्वणी असते.

1877 पासून ते आजपर्यंत गवताच्या हिरवळीवर ग्रास कोर्टवर ब्रिटिश परंपरेनुसार खेळवली जाणारी, जगभरच्या चार ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां‘मधील  मानाची स्पर्धा म्हणजे विम्बल्डन. इंग्लंडचे राजघराणे या स्पर्धेशी सुरुवातीपासूनच जोडले गेले. राज परिवाराकडून स्पर्धेला अधिकृत असे प्रायोजकत्व मिळाले. त्यामुळे स्पर्धेच्या नियम, अटींप्रमाणेच काही जुन्या परंपरासुद्धा कसोशीने पाळल्या जातात. स्पर्धेसाठी खेळाडूंना पांढऱ्याच रंगाचे कपडे वापरावे लागतात, स्टेडियसाठी गर्द हिरवा आणि जांभळा याच दोन रंगांचा वापर आजही होतो. विम्बल्डनमध्ये इतर खेळांप्रमाणे खेळाडूंना आपल्या अंगावरील वेशभूषेत कुठल्याही ‘ब्रँड’चा वापर करता येत नाही.  व्यावसायिकतेमुळे जाहिरातदार आले, जगातले इतर सगळे खेळ आणि स्पर्धा बदलल्या. पण विम्बल्डनने या बदलांना साफ नकार दिला. जाहिरातींच्या या युगात विम्बल्डनच्या कोर्टवर तुम्हाला एकही जाहिरातीचे होर्डिंग दिसणार नाही. मुख्य दोन प्रायोजकांचं नाव दिसेल पण, ते ही निवडक ठिकाणी. हिरव्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे घातले बॉल बॉईज आणि गर्ल्स हाही एक कुतूहलाचा विषय.

Advertisement

परंपरा आणि आधुनिकताही

विम्बल्डनचे नियम व्यावसायिक खेळाडूंना जाचक वाटतात पण काळाच्या ओघात अनेकांनी हे नियम स्वीकारले आहेत. खेळाडूंना सराव, ड्रेसिंग रूम आणि मैदानावरच्या सुविधा पुरवण्याबाबत विम्बल्डन इतर ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या तुलनेत खूप पुढे आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात देखील या स्पर्धेने कधीच मागे पुढे पाहिले नाही. आजघडीला अतिउच्च दर्जाचे अनेक कॅमेरे कोर्टच्या निरनिराळ्या भागात बसवण्यात आले आहेत. पावसामुळे वेळ वाया जाऊ नये, म्हणून कोर्टवर सरकतं छप्पर बांधण्याची कल्पकता, या सोयी टेनिसमध्ये सगळ्यांत आधी विम्बल्डनमध्येच पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञान असो व इतर सोयी सुविधा या सर्वांचा वापर स्पर्धेत अगदी कुशलतेने करण्यात येतो.

प्रेक्षकांचेही मोलाचे योगदान

विम्बल्डनचे प्रेक्षकही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अगदी मोजून टाळ्या वाजवणारे. पाऊस सुरु झाला तरी छत्र्या उघडून शांत बसणारे. फुटबॉल, क्रिकेटसारखा विनाकारण कडकडाट नाही, गोंधळ नाही. खेळाचा पूर्ण आनंद घेऊन आपली खानदानी क्रीडासंस्कृती दाखवून देणारे. जगभरातील अनेक देशातून विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी अनेक दिग्गज येत असतात. तिकिटेही तितक्या मोलमापाची. सामने पाहण्यासाठी अगदी वर्षभरापासून तिकीट बुकिंग सुरु होते, यावरुन या स्पर्धेचे महत्व व वलय लक्षात येते.

उन्हाळा आणि स्ट्रॉबेरी क्रीम

जुलै महिना इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरु होण्याचा कालावधी, त्यावेळी इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन झालेले असते, त्यामुळे या स्पर्धेच्या वेळी स्ट्रॉबेरी क्रीम खाणे हा  देखील एक परंपरेचा भाग आहे. दरवर्षी स्ट्रॉबेरी क्रीमसह स्ट्रॉबेरीचे अनेक पदार्थावर प्रेक्षकाकडून ताव मारला जातो.

विम्बल्डनचा राखणदार

‘रुफस‘ एक ससाणा आहे. विम्बल्डनने त्याची नेमणूक केली आहे ती, कबुतरांवर वचक ठेवण्यासाठी. तो कामावर असला की, कबुतरांचे जगणं मुश्कील झालेच म्हणून समजा. दोन आठवडे हा ससाणा विम्बल्डन संकुलावर घिरट्या घालतो. गेली दहा वर्षे हा ससाणा हे काम चोख बजावतो आहे. ‘रुफस‘चा दरारा एवढा आहे की, कबुतरे पंखांची फडफड करतानाही, दहावेळा विचार करत असतील. विशेष म्हणजे, सध्या तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. एखादे उपकरण या कामासाठी तयार केले जाऊ शकते, पण रुफसचे काम विम्बल्डन आयोजकांना अधिक सुरक्षित वाटते. आज घडीला अनेक खेळांनी कात टाकली आहे. अनेक नव्या नियम, नवे तंत्रज्ञान व इतर गोष्टींचा वापर केला जात आहे. विम्बल्डनही यात मागे नाही पण आपल्या पंरपंरेला अनुसरुन. खेळातले विजेते बदलत राहिले तरी, मूल्ये बदलत नाहीत हे विम्बल्डनने ओळखले आहे, हे मात्र विशेष.

Advertisement
Tags :

.