For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनू भाकर आणखी एका फायनलमध्ये

06:58 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनू भाकर आणखी एका फायनलमध्ये
Advertisement

25 मी एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानी : एकाच ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारी पहिली  

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देणारी मनू भाकर.. सरबजोत सिंगच्या साथीने मनूने दुसरे पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. यात आणखी भर पडली असून पदकांची हॅट्ट्रिक करण्याची मनूकडे नामी संधी असणार आहे. शुक्रवारी महिलांच्या 25 मी एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी दुपारी एक वाजता या प्रकाराची अंतिम फेरी होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत तीन फायनलसाठी पात्र ठरणारी ती पहिली महिला भारतीय आहे. आज 25 मी पिस्तूल प्रकारात ती पदक मिळवते का, याची उत्सुकता तमाम भारतीय चाहत्यांना लागली आहे.

Advertisement

शुक्रवारी 25 मी एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकर व ईशा सिंग यांनी भाग घेतला. आपल्या आवडीच्या एअर पिस्तूल प्रकारात तिने प्रिसीजन स्टेजमध्ये 294 गुण मिळवले तर रॅपिड प्रकारात 296 गुणांची कमाई केली. या स्टेजनंतर ती एकूण 590 गुणासह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. दुसरीकडे, ईशा सिंगची कामगिरी मात्र खराब झाली. अपेक्षित अशी कामगिरी न करता आल्यामुळे तिला 18 व्या स्थानी समाधान मानावे लागले. हंगेरीच्या मेजर व्हेरोनिकाने 592 गुणासह अव्वलस्थान पटकावले तर आयर्लंडची हेनिश रोस्टमियान 588 गुणासह तिसऱ्या क्रमाकांवर राहिली. पात्रता फेरीत सर्वोत्तम गुण असलेले अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

पदकांच्या हॅट्ट्रिकसाठी मनू सज्ज

25 मी एअर पिस्तूल स्पर्धेचा अंतिम सामना आज शनिवारी (3 ऑगस्ट) होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरु होईल. याआधी मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. आता भारताला मनू भाकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. आज होणाऱ्या फायनलमध्ये मनू भाकर कशी कामगिरी करते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. अर्थात, आज मनू भाकरने पदक जिंकले तर ऑलिम्पिकमध्ये तीन वैयक्तिक पदके जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरेल. याशिवाय, ऑलिम्पिक इतिहासात एकाच वर्षात तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची एकमेव खेळाडू ठरेल.

मनू भाकरची ऑलिम्पिकमधील कामगिरी

  1. महिला 10 मी पिस्तूल - कांस्यपदक
  2. मिश्र गट 10 मी पिस्तूल - कांस्यपदक
  3. 25 मी. एअर पिस्तूल - अंतिम फेरीत धडक

ऑलिम्पिकमध्ये 52 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास,टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने विजय

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आहे. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारताने तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने कांगारुंचा 3-2 ने धुव्वा उडवला. याआधी 1972 म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यानंतर तब्बल 52 वर्षानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. भारताचा हा पूल बी मधील पाचवा आणि शेवटचा सामना होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत साखळी फेरीतील तिसरा विजय मिळवला आहे. दरम्यान, भारताकडून अभिषेकने 1 तर हरमनप्रीतने 2 गोल केले.

गुरुवारी बेल्जियमविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीत मात्र भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. सामन्यातील 12 व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत भारताचे खाते उघडले व 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. यानंतर पुढील मिनिटाला भारताला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली. 13 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचे सोने करताना हरमनप्रीतने शानदार गोल केला व भारताला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 25 व्या मिनिटाला क्रेग थॉमसने गोल करत आघाडी कमी केली. मध्यंतरापर्यंत भारताकडे 2-1 अशी आघाडी होती.

तिसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक गोल करत भारताला 3-1 असे आघाडीवर नेले. यानंतर तिसऱ्या सत्रात कांगारुंना 39 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती, पण भारताचा गोलरक्षक श्रीजेशने उत्तम बचाव करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. यानंतर चौथ्या सत्रात गोव्हर्स ब्लेकने 55 व्या मिनिटाला गोल नोंदवला व ऑस्ट्रेलियाची आघाडी 3-2 अशी कमी केली. अखेरपर्यंत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेरीस भारताने हा सामना 3-2 फरकाने जिंकला व ब गटात दुसरे स्थान मिळवले.

Advertisement
Tags :

.