कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासगी, आल्वारा, कोमुनिदाद जागेतील घरांसाठी कायदा

12:48 PM May 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकांची घरे मोडण्याची सरकारला इच्छा नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Advertisement

डिचोली / प्रतिनिधी

Advertisement

 स्वत:च्या जागेत घरे बांधलेल्या लोकांची घरे दंड भरून कायम करण्यात येणार आहे. कुणाचे घर मोडण्याची सरकारला इच्छा नाही. वेळ पडल्यास आम्ही घरे बांधून देतो. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना काही बेकायदेशीर घरे जमिनदोस्त करावी लागतात. परंतु या विषयावरून सरकार व मुख्यमंत्री यांच्यावरच जास्त टीका होत असते. त्यासाठीच खासगी, आल्वारा व कोमुनिदाद जागेतील घरांना कायदेशीर छत्र देण्यासाठी सरकार नवीन कायदा आणणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बेकायदेशीर घरे कायम करण्याच्या कायद्याअंतगृ सुमारे 10 हजार अर्ज सरकारकडे आले होते, परंतु त्यातील सुमारे 2 हजार अर्ज मंजूर झाले आहेत. बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्यासाठी आता सरकार सुधारित कायदा आणणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  डिचोलीत जुन्या पोलिसस्थानकाच्या ठिकाणी साकारण्यात येत असलेल्या भव्य प्रशासकीय इमारतीच्या पायभरणी सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

 सर्वकाही घर बसल्या देण्याचा प्रयत्न 

सरकारतर्फे लोकांना ई सेवा देण्यावर मोठा भर दिला आहे. लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये कमी वेळ लागावा. लोकांना घरबसल्या सर्व सोयी मिळाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. कुळ मुंडकार खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सरकारने गती दिली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात हे खटले जलदगतीने सोडविले जात आहेत. अशा खटल्यांसाठी लोकांना वकील घेऊन येणे भाग पडू नये, त्यांनी स्वत:चे खटले स्वत: मांडण्याचा अधिकार असावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. त्या प्रकारची सूचना मामलेदारांना दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, यशस्विनी बी, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिश अडकोणकर, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी नेहाल तळावणेकर आदींची उपस्थिती होती.

 सर्व कार्यालये एका छताखाली

डिचोली तालुक्याची सर्व सरकारी कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा विचार असल्याने लोकांना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सेवा मिळणार आहेत. येथे असलेली जुनी इमारत न पाडता डागडुजी करण्यात येणार आहे. डिचोली व म्हापसाला जोडणारा बायपास रस्ता दहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. डिचोली मतदारसंघात पाण्याचे नियोजन करण्याचे कामही मोठ्या जोमाने सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 मोदींना पाठिंबा, सहकार्य द्यावे

भारत देश बलवान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखविले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व जवानांना व सरकारला लोकांनी आपापल्या परिने सहकार्य व पाठिंबा दिला आहे. आमच्या देशाला बाहेरील शक्तीपेक्षा अंतगृ असलेल्या देशद्रोही शक्तींचा मोठा धोका आहे. हा धोका नष्ट करण्यासाठी आम्ही देशवासियांनी सतर्क राहणे व सरकारला पाठिंबा देणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 विचार आला म्हणून प्रकल्प होत नाही

डिचोली मतदारसंघाचा आज राज्य सरकारकडून होत असलेला विकास हा केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळेच शक्य होत असून ही प्रशासकीय इमारत डिचोली शहराची शान ठरणार आहे. या इमारतीचा आराखडा योग्य पद्धतीने चालीस लावताना त्यात कला भवनाची निर्मिती म्हणजे डिचोलीतील कलाकारांसाठी पर्वणीच ठरणार आहे. केवळ डोक्यात विचार आला म्हणून प्रकल्प होत नाही, त्यासाठी योग्य नियोजन व ते सर्व सोपस्कर पूर्ण करून चालीस लावण्यासाठी योग्य आराखडा व पाठपुरावा आवश्यक आहे. हे सर्व सोपस्कर पूर्ण करून आम्ही पाठपुरावा केल्यानेच आज या प्रकल्पाला मूर्तस्वरुप प्राप्त होत आहे. या प्रकल्पाप्रमाणेच डिचोलीतील बसस्थानक, मॉडर्न अग्निशामक दलाची इमारतही लवकरच पूर्ण होणार आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, प्रेमेंद्र शेट व इतरांनी श्री देव कोटेश्वराचे दर्शन घेतले. या प्रशासकीय इमरतीच्या बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोनशीला अनावरण करण्यात आले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी यशस्विनी जी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या च्यारी यांनी केले. उपजिल्हाधिकारी नेहाल तळावणेकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article