राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली
बेळगावमधील लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी
बेळगाव : बेळगावमध्ये एका पंधरावर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. एका तरुणाने त्या मुलींशी मैत्री केली व नंतर तिच्या मित्रासह इतरांनी तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्याचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करण्यात आले. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. काँग्रेस सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडले असल्याचा आरोप खास. जगदीश शेट्टर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. गुन्हेगारांना पोलीस व कायद्याची भीती राहिलेली नाही. समाजामध्ये वाईट घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारची मात्र डोळेझाक सुरू आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी दर महिन्याला खात्यात पैसे देऊन अथवा बस प्रवास मोफत करून पुरेसा होणार नाही. तर महिला तसेच मुलींना सुरक्षा प्रधान करणे तितकेच महत्त्वाचे आहे. हमी योजना देण्याबरोबरच समाज कंटकावर कठोर कारवाई करणे गरजचे आहे. गुन्हेगारांना योग्यवेळी शिक्षा दिल्यास अशा घटनांची पुनरावृती होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सतर्क होऊन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.