राज्यात कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रणात
दरडोई उत्पन्नात 30 टक्क्यांनी वाढ : बेशिस्त वाहनचालकांकडून 34 कोटी दंड वसूल,राज्याच्या चौफेर प्रगतीची राज्यपालांकडून प्रशंसा
पणजी : राज्यात कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. गुन्हे शोधण्याचे हे प्रमाण 85.83 टक्के असून चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2023 पर्यंत एनडीपीएस कायद्यांतर्गत ऊ. 396.35 लाख किमतीचे 159.17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून 34 कोटी दंड वसूल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. शुक्रवारी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल बोलत होते. मद्यपान करून तसेच अतिवेगाने वाहन चालवण्याला लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत वाहतूक उल्लंघनाची एकूण 5,19,443 प्रकरणे दाखल करण्यात आली असून ऊ. 34.39 कोटी दंड वसूल करण्यात आला आहे, असे श्री. पिल्लई यांनी सांगितले.
पोलीस खात्याला योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न सुरू असून केपे येथे बांधकाम सुरू असलेली इमारत 70 टक्के पूर्ण झाली आहे. त्याशिवाय शापोरा येथेही किनारी सुरक्षा पोलीस स्थानकाच्या नव्या इमारतीचे लवकरच उद्घाटन होणार आहे, असे त्यांनी सांगितले. ऑक्टोबर 2023 पर्यंत या दलाने सुमारे 5527 कॉल्स अटेंड केले. त्याद्वारे 87 मानवी आणि 29 प्राण्यांचे प्राण वाचले आहेत. दलाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे 19.47 कोटी ऊपयांची संपत्ती वाचवण्यात यश आले, असे सांगून राज्यपालांनी अग्निशामक दलाच्या कार्याची प्रशंसा केली.
डबल इंजिन सरकार...
गेल्या काही वर्षांपासून डबल इंजिन सरकारने दिलेल्या बूस्टमुळे आपले राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे असून विविध क्षेत्रात गाठलेले टप्पे शाश्वत विकास निर्देशांक 3.0 मध्ये दिसून आले आहेत. गोवा एसडीजी निर्देशांक 2023 ची गणना करण्यासाठी नीती आयोगाच्या अनुषंगाने स्वत:ची कार्यपद्धती तयार करण्यात गोव्याने एक पाऊल पुढे टाकले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
दरडोई उत्पन्नात 30 टक्क्यांनी वाढ
पिल्लई म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रचंड गती घेतली असून 2019-20 च्या तुलनेत 2023 मध्ये 33 टक्के वाढ दिसून आली आहे. तसेच याच कालावधीत राज्याच्या दरडोई उत्पन्नातही 30 टक्क्यांनी वाढ झाली असून ही मोठी उपलब्धी आहे, असे राज्यपाल म्हणाले. जी20 बैठक तसेच आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल यांच्या यशस्वी आयोजनाबद्दल राज्यपालांनी राज्य सरकारसह पर्पल फेस्टच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. 24 तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत वीजपुरवठा, गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या प्रकल्पांचा राज्यपालांनी भाषणात उल्लेख केला.
पर्यावरणपूरक उद्योग...
ते म्हणाले की, गोवा स्टार्टअप धोरण, कृषी निर्यात धोरण, माहिती तंत्रज्ञान गुंतवणूक धोरण यातून राज्य सरकारने पर्यावरणपूरक उद्योगांच्या मुक्त प्रवाहासाठी लालफितीला बगल देण्यात आली असून जमीन वाटप आणि उद्योगांच्या बांधकामासाठी ’एकल-खिडकी’ मंजुरीसह गुंतवणूकदारांसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उद्योगांना व्यावसायिक भूखंड एका सोप्या लिलावाद्वारे उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे महसूल आणि नोकरीच्या संधी वाढतील, असे राज्यपाल म्हणाले. या उपक्रमांमधून एकूण 698.53 कोटी ऊपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे त्यात 5568 व्यक्तींची रोजगार क्षमता आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
गोवा लवकरच बनेल ‘स्मार्ट युटिलिटी स्टेट’
पिण्याचे पाणी पुरवठ्याबाबत गोवा एक आदर्श राज्य म्हणून उभे राहिले आहे. विविध जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या वाढीसह गोवा लवकरच ’स्मार्ट युटिलिटी स्टेट’ होईल. ते टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात सर्वांसाठी अखंड 24 तास पाणी देण्याचे उद्दीष्ट आहे, असे राज्यपाल म्हणाले. 100 टक्के मलनिस्सारण जोडणी साध्य करण्याच्या उद्देशाने सध्या चालू असलेल्या सर्व योजना या वर्षात सुरू करण्यात येणार असून एकूण सीवरेज ट्रीटमेंट प्लांट क्षमता 42.5 एमएलडी वर पोहोचणार आहे. आमदार-एलएडी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून यावर्षी आम्ही ऊ. 100 कोटी पेक्षा जास्त मंजुरी पाहणार आहोत. त्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी वार्षिक ऊ. 2.5 कोटी देऊन त्याच आर्थिक वर्षात सर्व कामे पूर्ण होतील याची खात्री करणार आहोत. या योजनेसाठी जलद मंजुरी आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून नोव्हेंबर 2023 पर्यंत सुमारे 173.20 कोटी ऊपयांची एकूण 1250 कामे पूर्ण झाली आहेत. त्याशिवाय ऊ. 601.00 कोटी किंमतीचे 13 प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, असे राज्यपाल म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी राज्याने भूपृष्ठ आणि भूजलाच्या विकासात केलेल्या प्रशंसनीय प्रगतीचा उल्लेख केला. तिळारी प्रकल्पामुळे सुमारे 6933 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे, असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे आभार
राज्याने केलेली विविध विकासकामे, पूर्ण केलेले प्रकल्प आणि एकुणच चौफेर प्रगतीचा राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातून उल्लेख केला. या कामांची त्यांनी प्रशंसा केली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सरकारची कामगिरी पुन्हा एकदा गोमंतकीयांसमोर पोहोचली आहे. त्याबद्दल आपण राज्यपालांचे आभार व्यक्त करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.