सत्वगुणाचा लावा अंगारा, रज तम गुण मागे सारा
अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, ईश्वर सोडून ज्या ज्या गोष्टीत मन रमतं ते सगळे विषय समजावेत. मनुष्य बाह्य गोष्टीतून सुख मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. विनाशी असलेल्या वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती यातून काही काळ सुख मिळतं हे बरोबर आहे. ते तसंच मिळत रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते पण सुख देणाऱ्या बाह्य गोष्टी ह्या नाश पावणाऱ्या असल्याने एकतर त्या नष्ट होतात किंवा बदलत जातात आणि त्यातून मिळणारे सुख संपते. असं घडलं की, मनुष्य दु:खी होतो. तसेच वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती अनुकूल असल्या तर माणसाला त्यातून काही काळ सुख मिळते. तसे ते आणखीही मिळावे किंवा मिळतंय तेव्हढे तरी सतत मिळत रहावे अशी त्याची अपेक्षा असते पण परिस्थिती सारखी बदलत असल्याने सुख देणाऱ्या अनुकूल गोष्टी प्रतिकूल होत असतात. असे झाले की, तो दु:खी होतो. म्हणून मी म्हणतोय की, विषयांपासून उत्पन्न होणारी सुखे शेवटी दु:खच देतात.
मग माणसाने काय करावे? प्रारब्धानुसार वाट्याला आलेल्या विषयसुखाचा आनंद घ्यावा की नाही? आपल्या प्रत्येक शंकेला बाप्पांच्याकडे उत्तर तयार आहे आणि तेही आपलं समाधान करणारं. बाप्पा म्हणाले, विषयातून सुख मिळत नाही हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे त्याच्याही वाट्याला प्रारब्धानुसार विषय येतच असतात, तो या नाशवंत गोष्टीतून मिळणारा आनंद जरूर घेत असतो पण तो तसाच कायम मिळत रहावा किंवा जास्त प्रमाणात मिळावा अशी अपेक्षा तो ठेवत नाही. विषयोपभोग मिळाले तर असुदेत पण नसले तरी चालेल अशी त्याची वृत्ती असते.
श्री गोंदवलेकर महाराजही सांगतात की, तुमच्या नशिबाने आज श्रीखंडपुरी खायला मिळाली आहे ना मग जरूर खा पण उद्या मिळाली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका म्हणजे झाले. जो मनुष्य आहे त्या परिस्थितीत समाधानी असतो तो कायम सुखी असतो. याउलट ज्याच्या इच्छा संपत नाहीत, त्याला क्रोध आवरत नाही तो कधीच सुखी होत नाही. म्हणून पुढील श्लोकात बाप्पा म्हणतात जो काम, क्रोध यांना आवरण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यभर सुखी राहतो.
कारणे सति कामस्य क्रोधस्य सहते च यऽ ।
तौ जेतुं वर्ष्मविरहात्स सुखं चिरमश्नुते ।। 23 ।।
अर्थ- विषयसुखाच्या लालसेने काम, क्रोध उत्पन्न होतात. जो देहबुद्धि टाकून, त्यांना जिंकण्याला समर्थ असतो त्याला शाश्वत सुख प्राप्त होते.
विविरण- माणसाला कायम सुखात राहण्याची इच्छा असते. ते सुख मिळवण्यासाठी परिस्थिती सदैव अनुकूल रहावी अशी त्याची इच्छा असते. बाह्य वस्तूतून सुख मिळते असे त्याला वाटत असल्याने त्या मिळवण्याची त्याला सतत इच्छा होत असते. हव्या असलेल्या वस्तू मिळवण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. जोपर्यंत त्या मिळत जातात तोपर्यंत तो शांत असतो पण परिस्थिती कायम अनुकूल असतेच असं नाही. हव्या त्या वस्तू मिळत नाहीत असं लक्षात आलं की त्या मी मिळविनच अशा अहंकारापोटी तो धडपडू लागतो पण ती धडपड वाया जात आहे असं लक्षात आलं की, त्यांची चिडचिड होऊ लागते, त्याला राग येऊ लागतो. एकदा माणसाला राग अनावर झाला की त्याचा स्वत:वरचा ताबा सुटतो. त्यामुळे करू नयेत ती कृत्ये तो करू लागतो. कित्येकवेळा असंही होतं की आपण करतोय ते चुकीचे आहे हे त्याला समजत असते परंतु अशावेळी बळावलेला रजोगुण त्याला काम आणि क्रोधाची शिकार बनवतो. हे काम क्रोध त्याचं मन आणि बुद्धी व्यापून टाकतात. त्यामुळे त्याला चूक काय बरोबर काय हेही कळायचं बंद होतं. हळूहळू त्याच्यावर तमोगुणाचा प्रभावही वाढू लागतो. हट्टी स्वभावामुळे त्याला मी करतोय तेच बरोबर आहे असं वाटू लागतं. असं चुकीचं वागणं हातून घडू नये म्हणून माणसाने सदैव ईश्वरस्मरण करावे म्हणजे त्याचा सत्वगुण वाढू लागतो.
क्रमश: