युद्धनौका ‘इंफाळ’चे जलावतरण
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते कार्यक्रम : भारताचे नौदल सामर्थ्य वाढणार
वृत्तसंस्था / मुंबई
स्वदेशनिर्मित युद्धनौका ‘इंफाळ’चे एका शानदार कार्यक्रमात, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले आहे. मुंबईत नौदलाच्या धक्क्यावर हा कार्यक्रम मंगळवारी झाला. ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रनाशक युद्धनौका असून रडारवर न दिसून येण्याची तिची क्षमता आहे. या नौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य अधिकच वाढणार आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारताच्या व्यापारी जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू, अशी गर्जना राजनाथसिंग यांनी जलावतरण कार्यक्रमात केली आहे.
ही ‘विशाखापट्टणम श्रेणी’तील युद्धनौका असून अनेक घातक शस्त्रास्त्रांनी युक्त आहे. हिंदी महासागर भागातील चीनच्या वाढत्या हालचालींना तिच्यामुळे प्रतिबंध घालता येऊ शकेल, असा विश्वास अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे. तिच्या जलावतरण प्रसंगी नौदलप्रमुख आर. हरीकुमार यांच्यासह नौदलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तिची निर्मिती नौदलाच्या नौकानिर्मिती विभागाने केली आहे. ‘प्रकल्प 158’च्या चार नौका उत्पादनांपैकी हे एक उत्पादन आहे.
शहरांची नावे
या प्रकल्पातील चार युद्धनौकांना भारतातील चार प्रमुख शहरांची नावे देण्यात आली आहेत. विशाखापट्टणम, मार्मागोवा, इंफाळ आणि सुरत अशी त्यांची नावे आहेत. इंफाळ युद्धनौकेची निर्मिती करण्यास भारतात निर्माण झालेल्या कोणत्याही युद्धनौकेपेक्षा कमी कालावधी लागला आहे, अशी माहिती राजनाथसिंग यांनी दिली.
अनेक वैशिष्ट्यो
ही अत्याधुनिक विनाशिका असून तिची निर्मिती भारतीय नौदलाच्या आवश्यकता लक्षात घेऊन करण्यात आली आहे. तिच्यावर ब्राम्होस आणि अन्य प्रकारांची क्षेपणास्त्रे बसविण्यात आली असून ती शत्रूच्या रडारवर न दिसणारी आहे. परिणामी, समुद्रात तिचे स्थान शोधून तिच्यावर हल्ला करणे आता शत्रूसाठी सोपे राहणार नाही. तिच्यावरील ब्राम्होस क्षेपणास्त्रे पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करणारी आहेत. तर भूपृष्ठावरुन आकाशातील लक्ष्यांवर मारा करणारी 8 बराक क्षेपणास्त्रेही ती वाहून नेणार आहे. याशिवाय स्वदेशनिर्मित 533 मिलीमीटर क्षमतेचे पाणतीर (टॉर्पेडो) प्रक्षेपक, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपक, तसेच दोन ध्रुव सी किंग हेलिकॉप्टर्सही तिच्यावरुन कार्यरत करता येणार आहेत.
वेगवान हालचाली
समुद्रात वेगवान हालचाली करून शत्रूच्या लक्ष्यांचा विनाश करण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे. ती तुलनेने अधिक काळ समुद्रात राहू शकेल. युद्धनौकांच्या सामूहिक अभियानामध्येही ती समाविष्ट करता येऊ शकेल. तसेच विमानवाहू युद्धनौकेची साहाय्यक नौका म्हणूनही ती उपयोगात आणता येणार आहे. अशाप्रकारे बहुविध उपयोगांसाठी ती सक्षम आहे. जेव्हा ती कोणत्याही सामूहिक अभियानाचा भाग असणार नाही, तेव्हा ती स्वबळावर कार्यरत राहू शकेल, अशी माहिती भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नौदल समृद्ध करणार
सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताला आपली सेनादले अधिकाधिक सामर्थ्यवान करण्याची आवश्यकता आहे. नौदलाची भूमिका भारताच्या संरक्षणात अत्याधिक महत्वाची आहे. भारताला प्रचंड मोठा सागरतट असून त्याच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व प्रामुख्याने नौदलावर आहे. अलिकडच्या काळात भारतीय व्यापारी नौकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. समुद्री चाच्यांना नष्ट करण्यासाठी भारतीय नौदलाचे सामर्थ्यवान होणे आवश्यक आहे. भारतीय नौकांवर हल्ला करणाऱ्यांना कोठूनही शोधून काढून नष्ट करण्यात येईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी जलावतरण कार्यक्रमातील भाषणात केले.
इंफाळ हे नाव का ?
विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिकांना भारतीय शहरांची नावे देण्यात आली आहेत. इंफाळ हे शहर ईशान्य भारतातील मणिपूर या राज्याची राजधानी असून हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. वास्तविक या शहराचा आणि समुद्राचा थेट संबंध नाही. मात्र, या शहराचे महत्त्व लक्षात घेऊन नाव देण्यात आले आहे.
‘इंफाळ’चे सामर्थ्य संख्यांमध्ये...
आकारमान
लांबी 163 मीटर्स
रुंदी 17.4 मीटर्स
भार 7,400 टन
अधिकारी आणि नौसैनिक
अधिकारी 50
नौसैनिक 300
शस्त्रसंभार
ब्राम्होस क्षेपणास्त्रे 16
बराक क्षेपणास्त्रे 8
ध्रुव हेलिकॉप्टर्स 2
पाणतीर प्रक्षेपक 4
मुख्य तोफा 127 एमएम दूरपल्ला
इतर गन्स 30 एमएम एके 630
इतर वैशिष्ट्यो
संपूर्णत: स्वदेशनिर्मित
रडारवर न दिसण्याची क्षमता
तुलनेने वेग अधिक
समुद्रात वास्तव्य अधिककाळ