For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात 15 विमानतळ प्रकल्पांचा शुभारंभ

06:51 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशात 15 विमानतळ प्रकल्पांचा शुभारंभ
Advertisement

आझमगडसह 5 शहरांना नवीन विमानतळ : बेळगाव, कोल्हापूर, पुणे, हुबळीत नवीन विस्तारित टर्मिनल

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये सुमारे 10,000 कोटी रुपये खर्चाच्या 12 नवीन टर्मिनल इमारतींसह 15 विमानतळ प्रकल्पांचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम सर्वात मोठा इन्फ्रा संस्करण म्हणून चिन्हांकित करण्यात आला असून यामध्ये नवीन विमानतळ, विस्तारित टर्मिनल, आगामी विमानतळ आणि इतर संबंधित सुविधांसाठी पायाभरणी करण्यात आली आहे. या नवीन टर्मिनल इमारतींमुळे देशात हवाई संपर्क वाढणार असून पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. यासोबतच सदर भागात आर्थिक समृद्धी प्राप्त होणार आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याचा रविवारी दुसरा दिवस होता. याप्र्रसंगी आझमगड येथून पंतप्रधान मोदींनी देशभरातील 15 विमानतळांचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या प्रकल्पात पुणे, कोल्हापूर, ग्वाल्हेर, जबलपूर, दिल्ली, लखनौ, अलिगढ, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती आणि आदमपूर विमानतळावरील 12 नवीन टर्मिनल इमारतींचा समावेश आहे. तसेच  कडप्पा, हुबळी आणि बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आतापर्यंत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने  चेन्नई, पोर्ट ब्लेअर, सुरत आणि तिऊचिरापल्ली विमानतळांवर अत्याधुनिक नवीन एकात्मिक टर्मिनल इमारती कार्यान्वित केल्या आहेत. तसेच, कानपूर विमानतळ, राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेजू विमानतळ आणि महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम येथे नवीन टर्मिनल इमारतींचेही उद्घाटन करण्यात आले.

सुधारणांचे उद्दिष्ट

भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी दतिया, उदयपूर, जोधपूर आणि राजमुंद्री येथे नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणीही करण्यात आली. 8,903 कोटी रुपये खर्चून 12 नवीन टर्मिनल इमारती विकसित केल्या जात आहेत. यांची एकत्रित क्षमता वार्षिक 615 लाख प्रवाशांना सेवा देऊ शकेल. या प्रकल्पांचा उद्देश प्रवाशांच्या सुविधा वाढवणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हे आहे.

अनेक हायटेक सुविधा उपलब्ध

पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, या टर्मिनल इमारती विविध प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत. चेक-इन काउंटर, एरोब्रिज, बॅगेज कन्व्हेयर आणि पुरेशी सवलत क्षेत्रे येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कडप्पा, हुबळी आणि बेळगाव विमानतळांवर एकूण 908 कोटी रुपये खर्चून तीन नवीन टर्मिनल इमारतींचा विकास हाती घेतला आहे.

प्रवासी क्षमता वाढेल

सरकारच्या म्हणण्यानुसार, विमानतळांवरील विकास कामानंतर या विमानतळांची एकत्रित प्रवासी हाताळणी क्षमता वर्षाला 95 लाख प्रवाशांपर्यंत पोहोचेल. या नवीन टर्मिनल इमारतींमध्ये दुहेरी इन्सुलेटेड रुफिंग सिस्टम, ऊर्जेची बचत करण्यासाठी छतांची तरतूद, एलईडी लायटिंग, कमी उष्णता वाढणारे डबल ग्लेझिंग युनिट्स, सौर ऊर्जा संयंत्रे इत्यादी विविध टिकाऊपणा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. या विमानतळांची रचना त्या-त्या राज्याच्या आणि शहरातील हेरिटेज वास्तूंची झलक लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. अशाप्रकारे स्थानिक संस्कृती आणि परिसराचा वारसा विमानतळांवर निदर्शनास येणार आहे. तसेच विमानतळांवर प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने सर्व विमानतळांची भित्तिचित्रे आणि स्थापत्यशैली साकारण्यात आली आहेत

Advertisement
Tags :

.