अतिसार थांबविण्यासाठी मोहीम राबवा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याची आढावा बैठक
बेळगाव : तीव्र उलटी-जुलाबामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शुन्यावर आणण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने उलटी-जुलाब थांबविण्यासाठी मोहीम आखली आहे. या योजनेची जनतेमध्ये जागृती निर्माण करून जिल्ह्यातील कोणत्याही बालकाला अतिसारचा त्रास होणार नाही यासाठी आरोग्य खात्याने ही मोहीम यशस्वीरित्या राबवावी. तसेच 0 ते 5 वयोगटातील बालमृत्यू थांबविण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिल्या. बुधवारी जि. पं. सभागृहात झालेल्या जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आरोग्य खात्याचे अधिकारी पर्यावरण स्वच्छता, हात कशा प्रकारे धुवावेत, वैयक्तिक स्वच्छता, उलटी जुलाबबाधित मुलांसाठी आपत्कालीन काळजी व योग्य उपचार याबाबत सार्वजनिक विशेषत: पालक व मुलांमध्ये जागृती निर्माण करावी. आरोग्य खात्याने सरकारने घालून दिलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करून जिल्ह्यातील कोणत्याही बालकाला उलटी-जुलाबचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली.
ते पुढे म्हणाले, पावसाळा सुरू झाला आहे. यामुळे साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ शकते. ज्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यासारखे आजार पसरतात. यासाठी आरोग्य खात्याने योग्य ती पावले उचलावीत. ग्रा. पं. च्या माध्यमातून गावांमध्ये फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी. जिल्ह्यातील 60 वर्षांवरील नागरिकांना बीसीजी लस दिली जात आहे. त्याचबरोबर पाच वर्षांपासून क्षय रोगामुळे ग्रासलेल्या रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना मधुमेह व वजन कमी असलेल्यांना बीसीजी लस देण्यात येणार असून बीसीजी लसीकरणाद्वारे जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जि. पं. उपसचिव बसवराज अडवीमठ, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, चिकोडीचे अप्पर आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. गडद, डॉ. व्ही. व्ही. शिंदे, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदनी देवडी, डॉ. एस. एस. सायन्नावर, कृष्ठरोग नियंत्रणाधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. विश्वनाथ भोवी, डॉ. विवेक होन्नळ्ळी आदी उपस्थित होते.