लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपला नडला ‘अतिआत्मविश्वास'!
संजय देशपांडे लातूर
लातूर लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे हे विजयी झाले. या निवडणुकीत मागील दोन टर्म निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवाराला भाजपतील अंतर्गत गटबाजी व 'अतिआत्मविश्वास' मुळे पराभव पत्करावा लागला.
भाजपचे लोकसभा समन्वयक तथा जिल्ह्याचे सर्वेसर्वा, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या एककल्ली स्वभावामुळे भाजपचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील भाजपतील अंतर्गत गटबाजीला त्यांनी खतपाणी घातले. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची भावना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे.
याउलट काँग्रेसने उच्चशिक्षित असलेल्या डॉक्टर उमेदवाराला उमेदवारी दिली. पहिल्यापासून प्रचाराचे पारडे जड राहिले. त्यात मराठा आंदोलन व एकगट्ठा मुस्लिम मते या ‘एम' फॅक्टरमुळे डॉक्टर निवडून आल्याची चर्चा आहे. लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी तिकीट मिळवून आघाडी घेतली असली तरी त्यांना तिकीट मिळाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. त्यांना तिकीट मिळू नये असा भाजपमधील काही जणांचा मतप्रवाह होता. परंतु त्यांनी तिकीट मिळविले. त्यानंतरच्या महायुतीच्या पहिल्या मेळाव्यात लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन या बैठकीला उपस्थित होते. परंतु या बैठकीतच भाजपतील अंतर्गत गटबाजी समोर आल्याने पालकमंत्री महाजन यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अलिप्त राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत लातूरला पालकमंत्र्यांची एकही सभा झाली नाही. उलट त्यांनी धावती भेटही दिली नाही. त्यामुळे लातूरच्या या गटबाजीला काही अंशी पालकमंत्रीही जबाबदार आहेत की काय असे बोलले जाते. त्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी माझ्या हातात लोकसभेची संपूर्ण यंत्रणा दिली तरच मी काम करेन, असे वरिष्ठांना सांगितल्याने नाइलाजाने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हातात लोकसभेची संपूर्ण यंत्रणा देण्यात आली. त्यानंतर मात्र निलंगेकर यांनी आपल्या गटातील कार्यकर्त्यांनाच पक्षीय यंत्रणेत सामावून घेतले नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत व्यासपीठावर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना मोदीजींचा परिचय करून दिला. याउलट तळागाळातील कार्यकर्त्यांना व्यासपीठावर फिरकूही दिले नाही. याबाबत अनेकांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. तसेच लोकसभेची जबाबदारी दिलेल्या आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदारसंघातच भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मताधिक्य कमी मिळाल्याने निलंगेकर यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याउलट काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी सामूहिकपणे प्रचार यंत्रणा राबवून सर्वांना सोबत घेऊन काँग्रेसच्या पडत्या काळात साथ दिल्याने व जिल्ह्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्त प्रचार यंत्रणा कार्यरत ठेवली. तसेच लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार धीरज देशमुख यांनीही लातूर ग्रामीणमधून मोठी आघाडी मिळवून दिली. भाजपच्या बलाढ्य यंत्रणेसमोर काँग्रेसची यंत्रणा उभी करणे तसे सोपे काम नव्हते. परंतु आ. अमित देशमुख यांनी हे शिवधनुष्य पेलले. शिवाय स्व. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची लोकसभेची गमावलेली जागा मिळवून देऊन एक प्रकारे लातूर जिल्ह्यावर आपले वर्चस्वच प्रस्थापित केले, असे म्हणावे लागेल.
याउलट पुढील काळात झालेल्या पराभवामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी, हेवेदावे हे सुरूच राहणार असून, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल की काय, असेही बोलले जाते. भाजपमधील औशाचे आ. अभिमन्यू पवार व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वैर हे सर्वश्रुत आहे. लातूर शहरात आ. अभिमन्यू पवार यांचे काहीअंशी वर्चस्व असताना या लोकसभेच्या निवडणुकीत ते फारसे सक्रिय दिसले नाहीत. उलट त्यांनी धाराशिव लोकसभेची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगून टाळले. परंतु त्या ठिकाणीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.