Satara News : तळबीड गावातील मुलींना महाराणी ताराराणींच्या स्मृतीत लाठीकाठी प्रशिक्षण
महिला सबलीकरणासाठी तळबीड ग्रामपंचायतीत लाठीकाठी प्रशिक्षण
उंब्रज : तळबीड गावाला सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराराणी यांची गौरवशाली परंपरा आहे. रणकौशल्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे जाज्वल्य तेज जपणाऱ्या या ऐतिहासिक बारशाचा सन्मान म्हणून तळबीड ग्रामपंचायतीतर्फे गावातील मुलींसाठी लाठीकाठीचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महाराणी ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
तळबीड ग्रामपंचायतीने उमेश मोहिते मित्रपरिवार यांच्या सहयोगातून पहिली ते दहावीतील मुलींसाठी हा प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला. आजच्या काळात मुलींमध्ये आत्मरक्षण, आत्मविश्वास आणि शारीरिक सक्षमतेची गरज लक्षातघेऊन हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
उद्घाटन प्रसंगी गावच्या सरपंच मृणालिनी मोहिते यांनी मुलींना प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले.उपसरपंच संगीता मोहिते, दादासो मोहिते, अमोल लोहार, अनिल वाघमारे, रमेश जाधव, वंदना वाघमारे तसेच उमेश मोहिते मित्रपरिवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
उमेश मोहिते यांनी मुलींच्याउत्साहाचे कौतुक करत तळबीड गावात महिला सबलीकरणासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचे सांगितले. तसेच महाराणी ताराराणी यांच्या संघर्षमय आणि शौर्यपूर्ण जीवनातून प्रेरणा घेत मुली या प्रशिक्षणाद्वारे स्वसंरक्षणाचे तंत्र शिकत आहेत. लाठीकाठीच्या तालावर उमटणारे दृढ निश्वयाचे स्वर गावाच्या ऐतिहासिक ओळखीलाही बळ देत आहेत.