ताज्या चाचणीचा भाजपला धक्का
बेचैनी वाढलेली आहे. दिवस अस्वस्थतेचे आहेत. काहीच ठीक चाललेले नाही. काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी (वस्तुकर) कमी करून सगळीकडे जणू दिवाळी सुरु झाली आहे, असे चित्र रेखाटण्याचे काम जोमाने सुरु झालेले असले तरी हा प्रायोजित कार्यक्रम म्हणजे फुसका बार आहे, असे दिसत आहे. सरकारला गरीबांचा एवढा कळवळा असला तर त्याने गेल्या काही वर्षात या वस्तूंवर वाढीव कर लादून लाखो करोड रुपये का बरे लाटले? पेट्रोल आणि डिझेलचे आकाशाला भिडलेले भाव कमी करण्याचा का बरे प्रयत्न केला जात नाही? असे खडे सवाल विचारले जात आहेत. ‘स्वस्ताई आली. दिवाळी आली’, या सरकारी मोहिमेने कोणाला किती फायदा झालेला आहे हा संशोधनाचा विषय आहे.
व्होट चोरीचा मुद्दा दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. राहुल गांधी यांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ अजून येण्याचे बाकी आहे. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर तोफ डागली की तीस मिनिटांच्या आत आयोगाचे समर्थन करणारी पत्रकार परिषद भाजपाद्वारे का बरे आयोजित केली जात आहे? असा सवाल एका माजी मुख्य निवडणूक आयुक्ताने विचारला आहे तो बराच बोलका आहे. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेतील दोष आणि वैगुण्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’ या विषयावरील सी-वोटरच्या ताज्या चाचणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात केवळ 10 टक्केच फरक आता शिल्लक राहिलेला आहे आणि गांधी यांनी बरेच अंतर कापलेले आहे असे सांगितले गेले आहे. ही संस्था म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असे खेळ करणारे चाचणी बहाद्दर आहे, असे सर्वसाधारण मानले जाते. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे. ताज्या पाहणीत पंतप्रधान 5 अंकांनी खाली घसरले आहेत तर राहुल 5 अंकांनी वर चढलेले आहेत, असे अजब चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणूक होऊन 16 महिने होत आहेत तोपर्यंत अशी झालेली स्थिती कोणत्याही सत्ताधारी पक्षाकरता फारशी चांगली नाही. हे दावे कितपत बरोबर अथवा चूक हे काळच दाखवेल पण त्याने परिस्थितीतील अस्वस्थताच प्रतित होत आहे.
बिहारमधील निवडणूक ही विचित्र वळण घेत आहे. कालपरवापर्यंत सत्ताधारी रालोआ गठबंधन जिंकेल असे दिसत होते. राहुल यांच्या व्होट चोरीच्या मुद्यावर वातावरण गरम होत असताना ‘पीके फॅक्टर’ ने ती भोवऱ्यात अडकलेली दिसत आहे. प्रशांत किशोर (पीके) यांनी राज्यातील भाजपच्या तालेवार नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपात पक्ष गुरफटून गेलेला दिसत आहे. या नेत्यांना त्यांच्यावरील आरोपांचे प्रभावीपणे खंडन करता येत नाही, असे दिसत आहे. काँग्रेसविरोधी राहिलेले पीके हे भाजपचीच बी टीम आहेत असे आरोप वाढत आहेत हे देखील तेव्हढेच खरे. नितीश कुमार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी गेल्या निवडणुकीत भाजपने चिराग पासवान यांचा वापर केला होता, हे विसरून चालणार नाही. व्होट चोरीचा मुद्दा कायमचा दबला जावा याकरता गैरभाजप पक्ष सत्तेत आणण्याचे राजकारण केले जाईल, असा कयास लावला जात आहे. हारकर भी जीतनेवालेको बाजीगर कहते हैं/ अथवा असेच काही.
लडाखमधील परिस्थितीने पेट घेतला आहे. तेथे झालेल्या हिंसाचारानंतर सोनम वांगचूक यांना झालेली अटक म्हणजे आगीत तेल ओतण्याचे काम झालेले आहे. मॅगसेसे अवॉर्ड जिंकणारे वांगचूक कालपरवापर्यंत भाजपच्या गळ्यातील ताईत होते. त्यांना अचानक देशद्रोही भासवले जात आहे. मणिपूरमध्ये शांतता अजून प्रस्थापित झालेली नसताना दुसऱ्या एका सीमाभागातील प्रदेशात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तेथील स्थानिक लोकांच्या भावनांचा अनादर केल्याने असे झाले आहे, असे दिसत आहे. बेकारी वाढत असताना खाली झालेली सरकारी पदे देखील वर्षानुवर्षे भरली जात नसल्याने तरुणांची नाराजी वाढत आहे. आज लडाखने पोलीस छावणीचे रूप घेतले असल्याने दिसणारी शांतता वरवरची आहे. अरुणाचल प्रदेश सारख्या बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या सीमावर्ती प्रदेशात वांगचुक यांच्यावरील कारवाईने क्षोभ निर्माण झालेला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतपूर्ती निमित्त पंतप्रधानांनी दसऱ्याला प्रसारमाध्यमांत लेख लिहून संघाची भलावण केलेली आहे. दसऱ्याला नागपूर मेळाव्यात केलेल्या भाषणात मोहन भागवत ऑपरेशन सिंदूरच्या संबंधात त्यांनी सरकारच्या नेतृत्वाची वाहवा केली तसेच अमेरिकेने जे भारत विरोधी धोरण अवलंबिले आहे त्याबाबत त्याची निंदा केली. पंतप्रधानांनी 11 सप्टेंबरला भागवत यांच्या 75री निमित्त लिहिलेल्या लेखात सरसंघचालकांची तोंडभरून स्तुती केली होती. आता मोदी-शाह आणि संघात दिलजमाई झाली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नवीन भाजप अध्यक्ष किती सत्वर नेमला जाणार त्यावर आहे. ते झाले नाही तर शंकेची पाल चुकचुकणारच. सध्यातरी पुढील भाजप अध्यक्ष कधी बनणार याबाबत सगळीकडे अळीमिळी गुपचिळी आहे.
तऱ्हेवाईक डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि त्याचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख यांची वारेमाप स्तुती करून त्यांना जणू ‘शांतिदूत’ घोषित करत भारताला डागण्याच दिल्या आहेत. ट्रम्प यांच्या आशिर्वादाशिवाय पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात वादग्रस्त संरक्षण करार होणे अशक्य होते. आर्थिक दृष्टीने दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानला सौदीकडून बरीच आर्थिक मदत मिळण्याचा दरवाजा खुला झालेला आहे. काही वर्षांपूर्वीपासून सौदी अरेबिया हा पाकिस्तानला फारशी आर्थिक मदत करेनासा झाला होता. कतारवर एक-दोन महिन्यापूर्वी इस्राईलने केलेल्या हल्ल्याने अण्वस्त्रधारी पाकिस्तान सौदी अरेबियाला महत्त्वाचा वाटू लागलेला आहे.
भारताने त्यावर एक उतारा म्हणजे पाकिस्तानचा हाडवैरी समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानशी मैत्री वाढवण्याचे ठरवलेले दिसत आहे. तालिबान सत्तेवर आल्यावर अफगाण परराष्ट्र मंत्री प्रथमच पुढील आठवड्यात नवी दिल्लीला भेट देत आहेत. अमेरिकेने लादलेल्या जबर व्यापार शुल्काने भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम आता जाणवू लागला आहे. अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारे कपडा उद्योग, हिरे आणि दागिने उद्योग, मशिनरी, मांस आणि प्रोसेसज्ड फूड, स्टील, अॅल्युमिनियम, ऑरगॅनिक केमिकल्स, मासळी, फूटवेअर असे वेगवेगळे उद्योग सरकारकडून मदतीची अपेक्षा करू लागले आहेत. पण त्यांच्या हाती लवकरच फार काही लागेल असे दिसत नाही कारण सरकार अजूनही ‘वेट आणि वॉच’ च्या मानसिकतेत आहे. तात्पर्य काय या उद्योगांमध्ये बेकारी वाढणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
ट्रम्प यांनी लावलेल्या वाढीव व्यापार शुल्काने 50 बिलियन डॉलर्स (अंदाजे 45,000 कोटी रुपये) निर्यातीला ग्रहण लागलेले असताना देशाचा आर्थिक विकास दर हा 6.5 ते 6.8 टक्के राहील असे सांगितले जात आहे. भारताला 2047 पर्यंत विकसित बनवायचे असेल तर हा विकास दर अतिशय तुटपुंजा आहे. त्याकरता पुढील दशक किमान 8 टक्के दराने देशाचा विकास होणे जरुरीचे आहे. वाढत्या बेकारीला आळा घालावयाचा असेल तर भारताला 12.2 टक्क्यांनी किमान वाढले पाहिजे असे विदेशी आर्थिक संस्था म्हणत आहेत.
परिस्थिती अशी बिघडत असताना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत’, हे निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांचे वाक्य फार सारगर्भित आहे. सध्याच्या सरकारात मोदी यांची भट्टी जमली आहे असे दिसत नाही आणि त्यांनी टाकलेले डाव उलटे पडत आहेत अथवा कुचकामी ठरत आहेत. ज्या ट्रम्प यांच्या मैत्रीवर भरोसा ठेवून मोदींनी अमेरिकेबरोबरील संबंधातून भारताच्या भरभराटीचे इमले रचले ते पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहेत. ‘आता तूप नको पण बडगा आवर’, अशी परिस्थिती बनलेली आहे. कारण ट्रम्प दिवसागणिक आर्थिक बाबीत भारतविरोधी एक नवीन आघाडी उघडत आहेत. पिक्चर अभी बाकी है!
सुनील गाताडे