For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मागील वर्षातील लोकअदालतमध्ये 80 हजार खटले निकालात

10:09 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
मागील वर्षातील लोकअदालतमध्ये 80 हजार खटले निकालात
Advertisement

3 अब्ज 3 कोटी 98 लाखांहून अधिक रुपयांची देव-घेव : पक्षकारांना मोठा फायदा

Advertisement

बेळगाव : प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी लोकअदालत भरविली जाते. तीन महिन्यांतून एकदा महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ही लोकअदालत भरविण्यात येते. वर्षाला एकूण चार लोकअदालती घेतल्या जातात. मागील वर्षामधील चार लोकअदालतींमध्ये 80 हजार 603 खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्ये 3 अब्ज 3 कोटी 98 लाख 49 हजार 224 रुपयांची देव-घेव झाली आहे. विक्रमी खटले निकालात काढून विक्रमी रकमेचीही उलाढाल झाली आहे. त्यामुळे पक्षकारांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. न्यायालय म्हटले की, सर्वसामान्य जनतेच्या अंगावरच काटा येतो. शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये, अशी म्हण प्रचलित आहे. न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे अनेक जण न्यायापासून वंचित राहत आहेत. एखादा खटला 20 ते 25 वर्षे रेंगाळत राहतो. त्यामुळे पक्षकाराला न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. शेवटी कंटाळून अनेक जण न्यायालयात जायचे टाळतात. मात्र त्यामुळे अनेकांवर अन्याय होत असतो. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन या लोकअदालतीला काही वर्षांपासून सुरुवात केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.

तीन महिन्यातून एकदा ही लोकअदालत भरविली जाते. बेळगाव बरोबरच तालुक्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरवून त्यामधून मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढले जात आहेत. मागील वर्षात दि. 11 फेब्रुवारी 2023 ला पहिली लोकअदालत झाली. त्यामध्ये 13 हजार 850 खटले निकालात काढले गेले. 62 कोटी 7 लाख 49 हजार 928 रुपयांची देव-घेव झाली. 8 जुलै 2023 रोजी दुसरी लोकअदालत पार पडली. त्यामध्ये 22 हजार 227 खटले निकालात काढले गेले. या लोकअदालतीमध्ये 1 अब्ज 1 कोटी 27 लाख 33 हजार 784 रुपयांची देव-घेव झाली. तिसरी लोकअदालत 9 सप्टेंबर 2023 रोजी झाली. त्यामध्ये 22 हजार 617 खटले निकालात काढले गेले. 67 कोटी 25 लाख 38 हजार 260 रुपयांची देव-घेव या लोकअदालतीमध्ये झाली आहे. चौथी लोकअदालत 9 डिसेंबर 2023 रोजी पार पडली. त्यामध्ये 21 हजार 909 खटले निकालात काढण्यात आले. एकूण 73 कोटी 38 लाख 27 हजार 252 रुपयांची देव-घेव झाली आहे. अशा एकूण 4 लोकअदालतींमध्ये 80 हजार 603 खटले निकालात काढले गेले आहेत. लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले खटले मोठ्या प्रमाणात निकालात काढण्यात आले. त्यामुळे पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत भरविण्यात आली. जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्या माध्यमातून लोकअदालत झाली. बेळगावातील सर्व न्यायालयाच्या न्यायाधीशांसह तालुक्यातील न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही मोठे सहकार्य केल्याने ही लोकअदालत यशस्वी झाली आहे.

Advertisement

किरकोळ शुल्क घेवून दिला जातो निकाल

लोकअदालतीमध्ये सर्वसामान्य जनतेकडून किरकोळ शुल्क आकारणी केली जाते. प्रलंबित असलेला खटला निकालात काढला जातो. बऱ्याचवर्षांपासून अनेकांना न्यायालयात ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे अनेक पक्षकार न्यायापासून वंचित राहतात. मात्र त्यांना तातडीने न्याय देण्याचे काम करण्यासाठी लोकअदालतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याला सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरलीमनोहर रे•ाr यांनी सांगितले.

पहिल्या लोकअदालतीत 22 हजार 834 खटले निकालात

यावर्षी 16 मार्च 2024 रोजी पहिली लोकअदालत पार पडली. यामध्ये  22 हजार 834 खटले निकालात काढण्यात आले आहेत. त्यामध्ये 90 कोटी 61 लाख 35 हजार 606 रुपयांची देव-घेव झाली आहे. पहिल्याच लोकअदालतीला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षीही उर्वरित तीन लोकअदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढले जातील, असे सांगण्यात आले.

दुसरी लोकअदालत 13 जुलै 2024 रोजी

तीन महिन्यातून एकदा लोकअदालत भरविली जाते. पहिली लोकअदालत पार पडली असून, दुसरी लोकअदालत होणार आहे. याबाबत कर्नाटक राज्य लोकअदालत प्राधिकारकडून याबाबत आदेश आला आहे. त्यामुळे त्या लोकअदालतीची जनजागृती आतापासून करण्यात येणार आहे. 13 जुलै 2024 रोजी दुसरी राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाणार आहे. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात खटले निकालात काढले जातील, असे सचिव मुरलीमनोहर रे•ाr यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.