सोशल मीडियावर शेवटची पोस्ट; उच्चशिक्षित युवकाची आत्महत्या
ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जी कारभाराने संताप
मणेराजूरी / विष्णू जमदाडे :
मणेराजूरी (ता. तासगाव) येथील उच्चशिक्षित युवक ऋतुराज सुरेश पवार (वय ३२) याने सोमवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने भावनिक संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे मणेराजुरीसह संपूर्ण परिसर हळहळला असून, अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे कुटुंबीयांच्या दु:खात आणखी भर पडली आहे.
सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास, ऋतुराजने गावातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर भावनिक स्वरूपाची पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता, कोड्याच्या माळालगत असलेल्या मुख्य साठवण तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने ‘लिओसीन’ हे द्राक्ष बागेवर वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
- आत्महत्येपूर्वी शेवटची पोस्ट :
नमस्कार, मी ऋतुराज मी बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावाखाली होतो याचे कारण मी स्वतः आहे. माझी स्वप्न आणि महत्वकांक्षा मोठया होत्या आणि त्या पूर्ण करणं ही माझी जबाबदारी होती पण त्याच ओझ मी माझ्या आईवडीला वर टाकलं. ही माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. त्यांनी त्याच्या परीने सर्व प्रयत्न केले.
पण माझी मानसिक संतुलन स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. मी यातून निघण्याचा खूप प्रयत्न केला पण गोळ्यांच्या ओव्हर डोसमुळे मी कधीच बाहेर पडू शकलो नाही. आज माझ्या वडिलच वय 63 आहे तरीसुद्धा त्यांना १२ तास काम कराव लागतंय याला मीच जबाबदार आहे. खरं सांगायचं झालं तर मी मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. आता मला महिन्याला ३-४ हजार रुपयेच्या गोळया खाव्या लागतात. म्हणजे मी परिवावर बोज बनत चालो आहे.
वाईट इतकच वाटतंय की माझ्या जवळ (share मार्केट kripto मार्केट, freelancing, इंजिनीरिंग डिग्री,world economy, etc)एवढे गुण असून सुद्धा मी माझ्या आई वडिलांना काही देऊ शकलो नाही, परमेश्वर सुद्धा मला माफ करणार नाही. माझ्या जिवलग मित्रांनो तुम्ही माझ्या अशा या स्थितीत सुद्धा साथ सोडली नाही त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. पण आपली साथ इथपर्यंत च होती. आता माझी जायचं वेळ आली आहे. मी गेल्यावर ज्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत तो माझा खरा मित्र आहे असं समजेन धन्यवाद.
- ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड
या गैरव्यवस्थेमुळे मृतदेह ५ तास ताटकळत पोस्टमार्टम कक्षात पडून होता. शेवटी पलूस येथून रात्री १ वाजता दोन कर्मचारी आले आणि त्यांनी पोस्टमार्टम पूर्ण केले.
या अपमानास्पद प्रकारामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले. आ. रोहित पाटील व माजी आमदार सुरेश पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले, मात्र प्रशासनाने त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले.
या प्रकारानंतर मणेराजूरीचे माजी जि.प. सदस्य सतीश पवार, बाजार समिती संचालक रामचंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य अरुण पवार, तसेच कुटुंबीयांनी सिव्हिल सर्जन, सांगली यांच्याकडे लिखित तक्रार केली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.